*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी लेखक दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*स्वर्णिम कोकण*
“कोकण..”
या शब्दातच एवढी मिठास आहे की नुसता उच्चारला तरी शब्दातील सौंदर्याने माणसे भारावून जातात, ओढीने कोकणाकडे धाव घेतात.. कोकणचे अपार सौंदर्य नजरेत साठवून तृप्ततेचा ढेकर देतात. “कोकण” म्हणताच डोळ्यासमोर उभी राहते ती फळाफुलांच्या अलौकिक सौंदर्याने नटलेली.. घनदाट वनराई अन् शेत शिवाराचा हिरवागार शालू नेसून सजली सवरलेली.. डोंगररांगांमधून फेसाळत झरझर झरणाऱ्या झऱ्यांच्या पाण्याने अभिषेक करून घेणारी..खळाळत वाहणाऱ्या ओहोळ, नद्यांना कडेवर घेऊन मिरवणारी पवित्र भूमी..! असंही म्हणतात की, कोकण म्हणजेच धरतीवरचा स्वर्ग..निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न..!
श्री परशुरामाने सागराला मागे हटण्यास सांगून सह्याद्रीवरून शरसंधान करून निर्माण केलेली ही भूमी म्हणून तिला “परशुरामाची भूमी” असेही म्हटले जाते.
अशा या कोकणचा निसर्गसंपन्न प्रदेश, अलौकिक सृष्टी सौंदर्य, उंचच उंच कडे, हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या, डोंगर उतारावरील पारंपरिक भातशेती, आंबा, काजू, कोकम, माड, फोफळीच्या बागा, बारमाही पाटाने वाहणारे झऱ्याचे निर्मळ पाणी, खडकांना ही पाझर फुटून डोंगरावरून धरतीच्या कुशीत बाहू फैलावत झेपावणारे शुभ्रधवल धबधबे, खळाळत वाहणाऱ्या नद्या, ओहोळ, विस्तीर्ण जलभारीत तलाव, ओसंडून वाहणारे बंधारे, लाटांवर स्वार होऊन किनाऱ्याच्या ओढीने धावणारा निळाशार सागर, गावागावांतील ग्रामदेवतेची मंदिरे, चालीरीती, रीतिरिवाज, सण-उत्सव, दशावतार, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती, कौलांनी शाकारलेली मातीची उबदार घरे अन् बाहेरून नारळा सारखे कडक अन् अंतरी मधुर, रसाळ शहाळ्यासारखी गोड कोकणी माणसे आणि त्यांचा पाहुणचार म्हणजेच “स्वर्णिम कोकण”..!
मुंबई पासून तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतचा प्रदेश हा कोकण मानला जातो. परंतु मुंबई हे प्रगत शहर असल्याने रायगड पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटक कोकण म्हणून पसंती देतात अन् मुंबईतून गावाकडे येणारे लोक सुद्धा “कोकणात निघालो” असे म्हणतात..आणि हे सुद्धा खरे की, कोकणचे सौंदर्य जर पहायचे, अनुभवायचे अन् डोळ्यांत साठावायचे असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्याखेरिज पर्याय नाही. कोकण रेल्वेने कोकणात येताना डोंगर पोखरून काढलेल्या बोगद्यातून येणारी रेल्वे कोकणातील अपार अलौकिक सौंदर्याचे दर्शन घडवते..ते नेत्रदीपक नजारे डोळ्यांचे पारणे फेडतात. कोकणात पूर्वी शेतकरी पावसापासून रक्षण करण्यासाठी शेत नांगरताना डोक्यावर खोळ, कांबळी, इरले घ्यायचे अन् मोठ्या कष्टाने डोंगर उतारावर भातशेती पिकवायचे. आज साधने बदलली तरी डोंगर उतारावर डौलात डुलणारी भातशेती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते..कधीकधी तर चिखल तुडवीत पर्यटकांना देखील भात लावणीच्या मोहात पाडते . दऱ्याखोऱ्यात वाऱ्यावर डोलणारी माड फोफळीची झाडे पाहिली की, जणू ती एकमेकांना आलिंगन देण्यासाठी आतुर झाल्यासारखी भासतात. कोकणातील शेतकरी माड फोफळींपासून अनेक उत्पादने घेतात आणि शेती बरोबरच आपले जीवनमान उंचावण्यासाठी इतरही जोडधंदे करतात. नारळाच्या करवंटी पासून चमचे, डाऊल आदी विविध शोभेच्या वस्तू बनवितात. नारळाचे शुद्ध तेल, माडी, केरसुणी, अंगणातील मांडवात आच्छादनासाठी विणलेल्या झावळ्या बनवतात, नाराळापासून जेवणात वापरण्यासाठी ओले खोबरे तर मिळतेच पण माड जुनाट झाला की घराच्या छप्परांसाठी लागणारे वासे सुद्धा काढतात, ते पिढ्यानपिढ्या टिकतात..म्हणून तर नारळ हा कल्पवृक्ष आहे. फोफळी पासून सुपारी मिळतेच पण झावळ्यांपासून नैसर्गिक पत्रावळी, द्रोण, चमचे अशा अनेक वस्तू तयार केल्या जातात. इतर प्लॅस्टिकच्या वस्तूंपेक्षा त्यांना मागणी देखील मोठी आहे. बांबू पासून अनेक शोभेच्या वस्तू, सोफा, खुर्ची, झोपाळे, टेबल, सूप, टोपल्या, रवळी, चटई आदी वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे कोकणातील लोकांची आर्थिक चणचण दूर होते, उद्योग व्यवसाय वाढीस लागतात.
कोकणातील आणखी एक महत्त्वाचा वृक्ष म्हणजे आंबा..! कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस तर देशविदेशात प्रसिद्ध..! फळांचा राजा असलेला हापूस, काजू, नारळ, कोकम, बांबू कोकणी माणसांची अर्थव्यवस्था सांभाळतात म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, हाती भरपूर पैसा नसला तरी आंबा काजू व्यवसायावर कोकणी माणसे सुखी जीवन जगतात, आनंदात दिवस काढतात. एवढेच नव्हे तर, याच आंबा उद्योगातून हजारो नेपाळी, युपी, बिहारी लोकांना रोजगार देतात.. तरी कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे का जातो..? अशी ओरड आहे. नक्कीच सुशिक्षित तरुण आपल्या गरजा भागविण्यासाठी, उंचावलेले राहणीमान राखण्यासाठी शहरात जातो..पण कुटुंबातील एक तरी माणूस गावचे गावपण राखतो अन् चाकरमानी होळी, मे महिना, लग्नसमारंभ, गणपती, दिवाळी असो की गावच्या ग्रामदेवतेची जत्रा…प्रत्येक सणाला गावच्या घराकडे धाव घेतो..आणि कोकणचे कोकणपण जपतो.
कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवतेची पुरातन मंदिरे आहेत. पंचायतन देवतेची मंदिरे, चौखांबा, मेळेकरी, ब्राम्हण स्थळे अशी अनेक मंदिरे आहेत. विमलेश्वर, रामेश्वर सारखी काही खडकात खोदलेली, कोरलेली पांडवकालीन मंदिरे, लेणी, स्वयंभू मंदिरे आहेत. गणपतीपुळे, मार्लेश्वर, श्री परशुराम मंदिर, खेड असगणीचे पांडवकालीन महादेव मंदिर, पाली, महड अष्टविनायक, रेडीचा स्वयंभू द्विभुज गणेश, हेदवीचा दशभुज गणेश, कुणकेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर अशी अनेक मंदिरे कोकणात पहावयास मिळतात. गावागावांतील मंदिरांमधून वर्षभर चालणारे भक्ती सोहळे, सप्ताह, देवदेवतांचे उत्सव, जत्रा आणि जत्रेतील खास आकर्षण म्हणजे कोकणातील प्रसिद्ध दशावतार नाटक यामुळे गावात गावकऱ्यांच्या एकीचे दर्शन होते. देवावर अढळ श्रद्धा आणि विश्वास यामुळे कोकणी जनता देवभोळी असल्याचे दिसून येते. देवतळीचे पाणी सुद्धा तीर्थ मानून प्राशन करते अन् श्रद्धेने प्राशन केलेल्या तिर्थाने रोगांवरही मात करते. कोकणात होळी, गणेश चतुर्थी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गावात पाच ते पंधरा दिवस होळी उत्सव चालतो. गणेश चतुर्थीमध्ये घरोघरी श्रीगणेशाचे पूजन ही कोकणची विशेषतः..! गणेशोत्सवामध्ये घरोघरी आरती, भजनादी कार्यक्रम धामधुमीत सुरू असतात. शेजारपाजार मध्ये एकोपा रहावा, एकमेकांच्या घरी जाणे येणे रहावे, संबंध सौदार्याचे रहावेत असा सण उत्सवांचा उद्देश असेल पण कोकणात सणाच्या काळात सर्वत्र भक्तिमय वातावरण पहावयास मिळते.
कोकणाला जशी निसर्गाची दैवी देणगी लाभली तशी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. अनेक किल्ले जलदुर्ग कोकणात पहावयास मिळतात. वसईच्या किल्ल्यापासून मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग, रत्नागिरीचा भगवती किल्ला(रत्नदुर्ग), पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, देवगड, तेरेखोल, यशवंतगड असे प्रमुख किल्ले इतिहासाची ओळख राखून उभे आहेत…
तर वसई, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली, तेरेखोल अशा विशालकाय खाड्या आपले बस्तान मांडून पहुडलेल्या आहेत. या खाड्यांमधून चालणारा मासेमारीचा व्यवसाय अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालवितो, कित्येक कुटुंबांना सधन बनवितो. कोकण किनारपट्टीवर सागरी मासेमारी देखील मोठ्या प्रमाणात चालते, कारण कोकणाला ५६० कि.मी.चा सागर किनारा लाभला आहे. हजारो युपी, बिहार, बंगाल मधील माणसे या मासेमारी उद्योगात खलाशी म्हणून नोकरी करतात अन् दहा महिन्यांच्या कालावधीत लाखोंची कमाई करून गाव गाठतात. त्यामुळे कोकण किनारपट्टी हजारो लोकांची पोशिंदा आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कोकणातील हरिहरेश्वर, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, रेडी आदी बंदरे कोकणच्या वैशिष्ट्यात आणखी भर घालतात. रेडी बंदरातून मायनिंगची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. स्थानिकांना रोजगार मिळतो.
देशी विदेशी पर्यटकांना खास आकर्षित करतात ते देशात स्वच्छ सुंदर किनारा म्हणून मान मिळविणारे भोगवे, तारकर्ली सारखे कोकणातील स्वच्छ, मनोहारी सागरकिनारे, बारमाही वाहणाऱ्या नद्या, गावचे गावपण, ग्रामीण जीवन, खाद्यसंस्कृती..यात खास करून मत्स्याहारी मालवणी जेवण, तांदळाच्या पिठाचे घावणे सोबत नारळाचा रस, आणि कोकणी माणसांचा प्रेमळ पाहुणचार..!
कोकणातील पांढऱ्याशुभ्र वाळूचे सागर किनारे अनेक पर्यटकांना मोहिनी घालतात. सळसळ करत सुरूच्या बनातून वाहणारा वारा जणू शीळ घालून कानात गुपित सांगून जातो असा भास होतो. कोकणातील बारमाही वाहणाऱ्या नद्या, त्यावरी बंधारे हे सुद्धा खास आकर्षण आहे. नद्यांच्या आजूबाजूला आनंदाने डोलणारी माड फोफळींची झाडे जणू खाली वाकून नदीच्या पाण्याला मिठीत घेत चुंबन घेऊ पाहतात की काय..? असा भास होतो..आणि अशा झुकलेल्या माडाच्या शेंड्यावर चढून नारळाची कोय कापून त्या ठिकाणी बांधलेल्या मडकीतून ताजी माडी काढणारा भंडारी बांधव पाहिला की त्याची ती कला पाहतच रहावे असे वाटते. नद्यांच्या दोन्ही काठाला फुललेली, बहरलेली शेती पाहिली की कोकणातील शेतकरी का आनंदी राहतात याचे गुपित समजून येते..
कोकणातील गावे देखील काळ्याकुट्ट डांबरी रस्त्याने शहरांना जोडलेली आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते ते कोकणचे गावपण.. गावातील मातीची घरे, गेरू, रेव्याने रंगवलेल्या भिंती, शेणाने सारवलेली माजघरातील जमीन अन् अंगण म्हणजे विना विजेचे हवेशीर वातानुकूलित जीवन..! दगडी पाट्यावर वाटलेलं खोबऱ्याचे वाटण, घरातील मातीच्या चुलीवर शिजलेले चवदार जेवण, लोखंडी तव्यावर भाजलेल्या अन् निखाऱ्यावर शेकलेल्या भाकऱ्या.. न्याहारीला उकड्या तांदळाची पेज आणि सोबत खोबऱ्याची शिरणी.. तांदळाच्या पिठाचे घावणे, आंबोळी आणि खोबऱ्याची चटणी.. कुळथाची पिठी नि भाजलेलं सुकट (सुके मासे)..मालवणी माश्याचे लालबुंद सार आणि पेडवे, बांगडे, तारल्याचे आंबट तिखट तिखले, खेकडे, तिसऱ्याचे चविष्ट कालवण, कालवं, सुंगटांची (कोळंबी) टोमॅटो, कांद्यात परतलेली भाजी..म्हणजे पर्यटकांसाठी जणू मेजवानीच..! म्हणून तर देश विदेशातील पर्यटक गाव खेड्यातील घरांमध्ये राहून जेवण बनविण्यापासून गावातील नित्याची कामे करण्याच्या पद्धती पाहून रममाण होतात, ग्रामीण जीवनशैली अनुभवतात अन् आपले त्रास, ताणतणाव विसरुन काही दिवस का होईना गावचेच होऊन जातात.
सकाळची सूर्याची सोनेरी किरणे झाडांच्या पानापानांतून कवडसे घेत सारी सृष्टी सोनेरी करून टाकतात अन् कोकणची भूमी सुवर्ण लेवून नटल्याची साक्ष देतात.. अशा या सुवर्ण लेऊन सजलेल्या कोकणात कशाचीही कमी नाही. कोकणी माणसांची अमाप शेती नसेल, मोठी बागायती सुद्धा नसेल पण जे आहे त्यात तो समाधानी आहे. ऋण काढून सण साजरा करीत नाही. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर सुखी असतो. याच कोकणच्या समृद्ध भूमीत हजारो गुजराती, मारवाडी येऊन व्यवसाय करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात.. युपी, बिहारी, कर्नाटकी, ओडिसी लोक येऊन खलाशी म्हणून मासेमारी बोटींवर काम करतात, नेपाळी लोक बाग बागायतींमध्ये राखंदारी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात..शेतीवाडी विकत घेतात आणि आयुष्याचे सोने करतात.. परंतु सुशिक्षित, सुसंस्कृत झालेले कोकणी तरुण व्यवसायाची कास न धरता मुंबई, पुण्याची स्वप्ने पाहतात..अन् कोकणाला सोडून परागंदा होतात. जर हजारो परप्रांतियांना कोकण रोजगार देऊ शकतं तर आपल्या मुलांना देणार नाही का..?
खरंच, कोकणाला समृद्ध करायचं असेल, स्वर्णिम कोकणचे वैभव चिरकाल अबाधित राखायचे असेल तर कोकणात येणारे प्रदूषणकारी प्रकल्प हद्दपार करून कोकणच्या निसर्गाची, सृष्टी सौंदर्याची जपणूक केली पाहिजे. कोकणचा साधेपणा अनेकांना भावतो, हाच साधेपणा, कोकणच्या कला, रीतिरिवाज, गावचे गावपण, ग्रामीण जीवनशैली, नैसर्गिक जलस्त्रोत, ऐतिहासिक वारसा स्थळे, मंदिरे, धार्मिकता, अध्यात्मिकता टिकवली पाहिजे. तर आणि तरच आपण आणि पर्यटक देखील स्वर्णिम कोकणची अनुभूती घेऊ शकतात, सुजलाम सुफलाम कोकण याची डोळा याची देही पाहू शकतो…
शेवटी एवढंच म्हणेन..
*शालू हिरवा सजून दिसतो कोकणच्या अंगावरी..*
*नका ओरबाडू धरती इथली विकासाच्या नावावरी..*
*कोकणचा हापूस काजू फणस चव असे त्यांची न्यारी..*
*कोकणी बांधवाला आहे अपुली कोकण भूमी प्यारी..*
✒️©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६