You are currently viewing अति घाई आणि…

अति घाई आणि…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*अति घाई आणि…*

 

 

‘अति घाई आणि संकटात नेई’ अशी एक मराठी म्हण आहे. तसं तर मराठी मध्ये आपल्या स्वभावातल्या प्रत्येक कलंदरीला अनुसरून अनेक म्हणी प्रचलित आहेत. आता या म्हणीचा अर्थ काय तर कुठल्याही गोष्टीत अति घिसाड घाई करू नये, शेवटी त्याचे पर्यवसन नुकसानीत होतं ,असा याचा थोडक्यात अर्थ. आपल्याला दिलेलं काम असेल तर आपण ते लवकर पूर्ण करू नये असा कुणीही याचा अर्थ काढला तर तो खोडसाळपणा ठरेल. कोणाच्याही बोलण्यावर, वागण्यावर किंवा एखादी घटना घडल्यावर त्यावर अती चपळाईने कुठलेही भाष्य करायला जाऊ नये किंवा कुठल्याही निर्णयाप्रत पोहोचू नये. कारण आपल्यालाही माहितीच आहे की आपल्याला जी बाजू दिसते आहे किंवा जी दाखवली जाते आहे ती खरी किंवा खोटी ही असू शकते. याच्या विरुद्ध जी दुसरी बाजू आहे ती पुढे यायला कदाचित वेळ लागू शकेल आणि कदाचित ती जास्त पटण्यायोग्य असू शकेल. त्यामुळे आपण आधी घेतलेल्या निर्णयावर किंवा केलेल्या भाष्यावर आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ शकते किंबहुना येतेच.

 

नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे तर खरंच आहे की वादावादीच्यावेळी, भांडणाच्यावेळी माणूस नको ते बोलून जातो. कदाचित ते कटू सत्य ही असू शकते पण ते बोलण्यामुळे त्या नात्याच कायमस्वरूपी नुकसान होतं. ज्याच्या खुणा आयुष्यभर पुसल्या जात नाहीत.पुन्हा भले नाती जुळून येतात पण मनं जुळत नाहीत. आणि तसंही एखाद्या परिस्थितीत माणूस चुकीच वागलाही असेल पण त्याचं परीक्षण करून निकाल देण्याआधी आपली ती योग्यता आहे का किंवा आपल्याला तो अधिकार आहे का हे कोणीही पडताळून बघत नाही. आपल्याला पटकन दुसऱ्याच्या कृत्याची शहानिशा करायची खोडच असते. अरे हे तू असं कसं केलं ? हे चुकीचे आहे? हे तू करायला नको होतंस …वगैरे वगैरे टोचून बोलणं तर जणू आपला जन्मसिद्ध हक्कच असतो. मीच एकटा कसा बरोबर बाकीचे सगळे कसे चुकीचे हे सतत जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करत असतो तेव्हा एकच गोष्ट होते की माणसं त्याला टाळायला लागतात.

 

त्याच्या अगदी विरोधी टोक म्हणजे एखाद्या व्यक्तीला इतक्या उच्च पदावर नेऊन बसवायचं की जणू त्याची पूजाच करायची बाकी ठेवली असावी असं वाटतं. आईला जसं वाटतं की आपलं मूल चुकीचं वागणंच शक्य नाही म्हणून ती सर्वतोपरी प्रयत्न करते की आपल्या मुलावरचं संकट दूर व्हावे किंवा लोकांनी त्याला चांगलंच संबोधावं अगदी तसंच हे लोक त्या व्यक्तीची पूजा करण्यात इतके आंधळे होतात की त्या व्यक्तीबाबत घडलेली कुठलीही वाईट घटना, त्याच्या विरोधात बोललेले मत त्यांना सहन होत नाही. मग त्या घटनेचं सांगोपांग सखोल ज्ञान असो वा नसो हे आपल्या प्रिय व्यक्तीची बाजू घेऊन बोलणारच बोलणार. बोलणार म्हणण्यापेक्षा भांडणार.

 

सध्याचा सोशल मीडियाचा जमाना हा आपल्या भावनिक आंदोलनांना खतपाणी घालणारा आहे. तुम्हाला व्यक्त होण्याचं 100% स्वातंत्र्य आहे आणि व्यासपीठही उपलब्ध आहे. शिवाय तुमच्या विचारांशी जुळणार्या विचारधारा इथे तुमचं स्वागतही करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वात पहिले कोण व्यक्त होतो या गोष्टीची स्पर्धा असल्यासारखं आपण पोस्ट टाकत राहतो किंवा फॉरवर्ड करत राहतो. त्या घटनेच्या तळाशी जाऊन त्याची शहानिशा करून, त्यात योग्य काय किंवा अयोग्य काय याचा न्याय निवाडा होईपर्यंत थांबणं आपल्याला मूर्ख किंवा मुखदुर्बळ ठरवेल की काय अशी शंका कदाचित वाटत असावी. ते काहीही असो पण अशी इम्पल्सिव्ह रिएक्शन देणे ही आजकालची फॅशनच बनू पाहते आहे. अजून टीव्हीवरून न्यूज घराघरात पोहोचली नाही तोपर्यंतच ती सोशल मीडियावरच्या पोस्ट द्वारे आपल्याला कळते आहे ‌, त्याला काय म्हणायचं? किती हा आतताईपणा? खरंच लोकांना थांबून विचार करायला थोडा देखील वेळ नाही का ? हजारो लाखो घटना पूर्ण जगभरात घडत असतात. पण प्रत्येक गोष्टीवर आपण आपलं मत नोंदवायलाच हवं अस आहे का? बरं ,समोर येणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात हे आता जवळजवळ सगळ्यांना माहिती झालेल आहे. हे जग जितकं चांगलं दिसतं किंवा जसं दिसतं तसं ते असत नाही तर ते चांगलं दिसावं म्हणून सतत काहीतरी तुमच्यासमोर येत राहील अशा गोष्टी पडद्यामागे मॅनेज होत राहत असतात, हे ही सर्वांना माहिती आहे. मग बसू दे ना थोडा धुरळा खाली. थोडा वेळ गेला, हवा स्वच्छ नि शांत झाली की खऱ्या गोष्टी आपोआप स्वच्छपणे दिसू लागतात. मग हवी तेवढी चर्चा आपण त्यावर करू शकतो. आपलं मत मांडू शकतो आणि हो, मत मांडायलाच हवं. मत मांडणं हे गैर नाहीच मग ते कुठल्याही विचारधारेच्या पुरस्कारार्थ का असेना. पण आजकालच्या भाषेत सांगायचं तर थोडा ‘चिल मार के’! प्रक्षोभक रीतीने केलेलं भाष्य काही हलक्या कानाच्या लोकांना भडकवणार ठरू शकतं आणि त्यामुळे विपरीत परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. कधी कधी या किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी अफवांचे रूप सुद्धा धारण करू शकतात. तेव्हा कुठलाही मीडिया असो प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया असो व्यक्त होताना सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवून आणि समाजभान जागृत ठेवून आपण विधान केलं पाहिजे, निदान सुशिक्षित म्हणविणाऱ्या लोकांनी तरी. इतक्या मोठ्या माहितीच्या जंजाळात खरी माहिती कुठली आणि खोटी माहिती कुठली हे कळणं जिथे भल्याभल्यांना शक्य होत नाही तिथं सामान्य लोकांचा काय पाड लागणार? ‌बरं एवढ्या सगळ्या उलथापालथी घडताना आपला वेळ यामध्ये किती वाया जात असतो? घडणाऱ्या गोष्टी घडत असतात, घडून जात असतात. ज्यांच्या बाबतीत घडल्यात तेही त्यातून पुढे निघून जातात आणि आपल्या हातात काय पडतं? निघून गेलेला वेळ! जो की आपण दुसऱ्या कुठल्यातरी चांगल्या कामात सहज वापरू शकलो असतो. आता हे झालं माझं मत. जितकं पटलं तेवढं घ्या आणि नाही पटलं तर सोडून द्या. वाद घालायला नक्कीच नका येऊ. हो ना, कारण तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. माझ्या मतावर किंवा माझ्या विचारांवर वाद घालण्यापेक्षा एखादं छानसं काम तुम्ही नक्कीच कराल, खर आहे ना?

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा