You are currently viewing जिल्हा बँकेची “बँक सखी” आता गावागावात कार्यरत होणार

जिल्हा बँकेची “बँक सखी” आता गावागावात कार्यरत होणार

सिंधुदुर्गनगरी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे कारण महिलांना सुलभ कर्ज पुरवठा जर झाला तर त्यांची इच्छा शक्तीची भरारी अधिक उंच जाईल हा आशावाद जिल्हा बँकेला आहे.

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या बचत गटांपैकी ८१४७ बचत गट जिल्हा बँकेकडे असून त्यांच्या सुमारे १३ कोटी पर्यंतच्या ठेवी बँकेकडे आहेत. या बचत गटांना बँकेने २० कोटी एवढे कर्ज ७ टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिलेले आहे. बँकेमार्फत महिलांच्या विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत असून, एकुण ६०४२ महिलांना रुपये ४५.१२ कोटी एवढा कर्ज पुरवठा केलेला आहे.

जिल्हा बँकेबरोबर राष्ट्रीयकृत बँका बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करत आहेत असे असताना सुद्धा आता नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या बचत गटांना वेगवेगळ्या योजना द्वारे मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करीत आहेत सदर कर्जाचा व्याज प्रतिमाह २ ते ३ टक्के म्हणजे वार्षिक २४ ते ३६% एवढा आहे या फायनान्स कंपन्या महिलांना त्यांच्या घरी जाऊन कर्ज पुरवठा तसेच वसुली करत असल्याने या महिला गरजेपोटी असे जास्त व्याज दराचे कर्ज घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कंपन्यानी गेल्या दोन ते तीन वर्षात २०० कोटी पेक्षा जास्त कर्ज व्यवहार केला आहे. या कर्जाचे व्याज भरण्यासाठी महिला अन्य बँकांकडे कर्ज मागणी करतात याचा दुष्परिणाम म्हणून या महिलांना भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

आज सिंधुदुर्ग बँकेकडे महिलांसाठी असणारा कर्ज व्यवहार पाहता कर्जाची वसुली १०० टक्के असून कोणत्याही प्रकारची खाती एन पी ए वर्गवारीत नाहीत. म्हणजे महिला कर्जाची नियमित परतफेड करू शकतात मात्र गरजू महिलांपर्यंत पोहोचून महिलांना घरपोच सेवा देणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकेने करस्पॉन्डन्स नियुक्ती केल्यास अशी सेवा महिलांना देता येईल. हे अभ्यासाअंती संचालक मंडळाचा लक्षात आले. त्या अनुषंगाने बँकेचे मा.अध्यक्ष व वरिष्ठ अधिकारी यांनी माणदेशी महिला सहकारी बँक., म्हसवड. ता. माण, जिल्हा सातारा या बँकेला नुकतीच भेट दिली त्यांचेमार्फत राबविलेल्या *बँक सखी* योजनेची सविस्तर माहिती घेतली आणि बँकेच्या संचालक मंडळाच्या इच्छाशक्तीची भरारी निश्चितच अधिक उंच जाईल हा आशावाद संचालक मंडळामध्ये निर्माण झाला आणि आता त्याला मूर्त रूप आता प्राप्त होत आहे.

दिनांक १३ ऑगस्ट ला अहिल्यादेवी होळकर स्मरण दिना दिवशी जिल्हा बँकेच्या बँक सखी प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचे बँकेने निश्चित केले आहे.

३०० वर्षांपूर्वी या अहिल्याबाई होळकर या राणीने शंभरहून अधिक मंदिरे बांधली नद्यांना घाट बांधले व सर्वात महत्त्वाचे माहेश्वरी वस्त्र उद्योग सुरू केला हीच दूरदृष्टी ठेवून बँक सखी योजना सिंधुदुर्ग बँक आकारला आणत आहे चूल व मूल या पलीकडचे जग जिला खुणावत आहे अशा महिलांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सखी घरी जाऊन भेटेल तिची मैत्रीण होईल जे माहेरी असताना ठरवले होते ते स्वप्न महिलांना पूर्ण करता येईल. स्वकमाई चे पैसे तिने निर्माण करावेत छोटे-मोठे उद्योग करावेत यासाठी एक माहेरचा हात देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

जिल्हा बँक ने *”बँक सखी”* नियुक्त केल्यानंतर गावा गावातील असंघटित महिलांना तसेच छोटे उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलाना घरपोच बँकिंग सेवा देता येणार असून तसेच अशा प्रकारचे काम करणाऱ्या महिलांच्या हातालाही काम मिळेल. आणि जिल्ह्यातील अनेक महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळेला सुलभ कर्ज पुरवठा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

बँकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात उमेद कडून परीक्षा पास झालेल्या २५ महिलांना सहभागी करुन घेतले जाणार आहे व या संखेत टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे.

बँक सखी च्या शुभारंभाचा कार्यक्रम शरद कृषी भवन ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमांला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक मा.नितेश राणे, जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा मा.नीलमताई राणे, भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव मा.वर्षाताई पवार-तावडे, कोल्हापूरच्या स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा मा.कांचनताई परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.किशोर तावडे व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मकरंद देशमुख, जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजक महिला तसेच नव्याने उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांनी तसेच सी.आर.पी, ग्राम संघाचे अध्यक्ष, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.मनीष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा