गॉथे मार्फत जर्मन भाषा तज्ज्ञ प्रा.चंद्रशेखर हिरेमठ यांची नियुक्ती
सावंतवाडी :
महाराष्ट्र शासन व जर्मनी येथील बॅडन वुटेनबर्ग या राज्यामध्ये तंत्रकुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत करार झाला आहे. त्याअंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सुरु करण्यात आले असून पहिल्या बॅचच्या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ आज करण्यात झाला.
सुमारे चार महिने कालावधीच्या या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे ए-वन, ए-टू, बी-वन व बी-टू श्रेणीपर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे. गॉथे संस्था, पुणे यांच्यामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येत असून मुख्य प्रशिक्षक या नात्याने मुंबई येथील जर्मन भाषा तज्ज्ञ प्रा.चंद्रशेखर हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.हिरेमठ यांना गेली तीस वर्षे जर्मन अध्यापनाचा अनुभव असून आजवर अनेक इंडो-जर्मन उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
प्रशिक्षण वर्गाचे दोन सत्रांमध्ये नियोजन करण्यात आले असून सकाळी साडेनऊ ते दीड व दुपारी साडेतीन ते साडेसात अशी वेळ राहणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जर्मन भाषा अभ्यासक्रम, विविध मोड्युल्स, परीक्षा स्वरूप याची माहिती देण्यात आली. जर्मनीमधील नोकऱ्या, जीवनशैली, कायदे कानून याबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील यावेळी प्रा.हिरेमठ यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.मिलिंद देसाई, प्रा.महेश पाटील व प्रा.मनिष घाटगे उपस्थित होते.