मालवण एसटी स्टॅन्ड समोरील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करणार…
सा. बां. विभागाच्या अभियंत्यांची ग्वाही: काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले होते लक्ष..
मालवण
मालवण एसटी स्टँड समोरील रस्त्यावर पावसाळी पाणी साचून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनधारक यांना होणाऱ्या त्रासाबाबत राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची व गटरांची पाहणी करून पाणी साचण्याच्या समस्येबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असे सांगितले.
मालवण एसटी स्टॅन्ड समोरील रस्त्यावर पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना त्रास होत आहे. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी काँग्रेस पदाधिकारी संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगावकर यांच्यासमवेत या रस्त्याची पाहणी केली. पाणी साचण्याच्या समस्येवर त्वरित उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.