You are currently viewing आज ४ जानेवारीपासून महाराष्ट्रभर “मागणी दिन” आंदोलन सुरू..

आज ४ जानेवारीपासून महाराष्ट्रभर “मागणी दिन” आंदोलन सुरू..

सिंधुदुर्ग :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना  मानधनाच्या निम्मी रक्कम सेवानिवृत्तीनंतर दर महा पेन्शन म्हणून मिळालीच पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज धरणे आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्कम सेवानिवृत्तीनंतर दर महा पेन्शन म्हणून मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात कमलताई परुळेकर यांच्यासह दिपाली पठाणी, नेहा मांजरेकर, वंदना पाटकर, लक्ष्मी परब, संयोगिता पालव, विद्या मेस्त्री, आदि पदाधिकाऱ्यांसह कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आज शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की एप्रिल २०१४ पासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी पेन्शन सरकार देत आहे. ही रक्कम देताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेले शेवटचे मानधन व तिने केलेल्या सेवेची वर्षे असा निकष ठेवला आहे. परंतु सेविकांना १ लाख व मदतनिसांना ७५ हजार रुपये ही मर्यादा आहे. निवृत्तीनंतर एकरकमी पेन्शन ची रक्कम घरासाठी किंवा मुलांच्या लग्नासाठी खर्च होऊन जाते. त्यानंतर संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू होते. हे टाळण्यासाठी निवृत्तीनंतर शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळालीच पाहिजे. या मागणीसाठी आजपासून महाराष्ट्रभर “मागणी दिन” आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचा एक भाग म्हणून आज येथे जिल्हा परिषदेसमोर १२ ते २ या कालावधीत धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहेत. या आंदोलनात कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले आहेत.

यावेळी आंदोलनाला संबोधित करताना कमलताई परुळेकर म्हणाल्या “२०१४ ला महिला व बाल कल्याण विभागाने दरवर्षी भारतीय आयुर्विमा महामंडळाला ४९ कोटी रुपये द्यायचे व त्यातून सर्व निवृत्ती कर्मचाऱ्यांना एलआयसी एकरकमी पेन्शन देईल.” असे करारात ठरले होते. “परंतु गेली तीन-चार वर्षे सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. याबाबत माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने एलआयसी ला ८१ कोटी ८ लाख रुपये दिले व एलआयसीने आतापर्यंत ७३ कोटी ३४ लाख रुपये निवृत्ती वेतन वाटले,” अशी माहिती उघड झाली आहे. असे कमलताई परुळेकर यांनी आंदोलनाला मार्गदर्शन करताना सांगितले.

सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असून या मागणीसाठी आज ४ जानेवारी हा “मागणी दिन “म्हणून पाळला जात आहे. आजच्या या धरणे आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य सरचिटणीस कमलताई परुळेकर यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे.

*शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा*

सर्वच अंगणवाडी कर्मचारी या शेतकऱ्यांच्या मुली, सुना व कुटुंबीय आहेत. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे चर्चेविना मंजूर करून शेती व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा छळ चालवला आहे. याबाबत अंगणवाडी कर्मचारी सभा तीव्र निषेध करत असून २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यानी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. तरी शासनाने शेतकऱ्यांबाबत तातडीने सकारात्मक तोडगा काढावा व शेतकऱ्यांची शेती वाचवावी, अशी मागणी यावेळी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =