*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृद्धापकाळ…*
कुठे मनाला वय असते कुठला वृद्धापकाळ
स्वप्ने पडती नवी नवी ती मनी सांजसकाळ
आज करावे काय ठरविती सकाळपासूनच
दिनक्रम तो किती व्यस्त हो, होते सांगूनच…
आज जायचे वनविहारा हिरव्या टेकडीवरी
साठी पुढच्या तरूणांची मग निघते पहा सवारी
हासत गात ते चुटके सांगत निघती सफारीला
कोण म्हणेल वृद्ध तयांना लाजवती तरूणतरूणीला..
निटनेटके कपडे असती केस कुळकुळीत काळे
अनुभवाची पोतडी सोबत पाहिले किती उन्हाळे
मार्गी लावती कुटुंब सारे निश्चिंत होऊनी सारे
खळखळणाऱ्या हास्याचे हो सदा वाहती वारे…
चिंता काळज्या कुणास सुटल्या ती तर जग रहाटी
वयपरत्वे येणारच हो हातामध्ये काठी
वय झाले, काढून टाका मनातून वृद्धत्व
नव्यानेच हो बालपण हे जीवनातले सत्व…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)