You are currently viewing विजेचा खेळखंडोबा, महावितरण विरोधात सावंतवाडी तालुक्यातील ग्रामस्थांचा उठाव

विजेचा खेळखंडोबा, महावितरण विरोधात सावंतवाडी तालुक्यातील ग्रामस्थांचा उठाव

*तांबोळी, असनिये, सातुळी-बावळाट आदी ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालयातील विद्युत पुरवठा केला बंद*

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जवळपास गेले २० दिवस थैमान घातले आहे. गेले चार पाच दिवस वादळी वाऱ्यांसह दिवस रात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून आधीच निमित्तमात्र असलेली जिल्ह्याची महावितरण व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा व माडखोल उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यात महावितरणचे जवळपास ३० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी सांगितले. महावितरणच्या सुमार वीज वितरण व्यवस्थेमुळे हैराण झालेले बांदा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तांबोळी, असनिये, ओटवणे दशक्रोशितील त्याच प्रमाणे माडखोल, सातुळी बावळाट आदी गावांतील ग्रामस्थांनी सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ तांबोळी असनिये गावात भेट देण्यास मजबूर केले.

सावंतवाडी तालुक्यातील तांबोळी, असनिये, सातूळी बावळाट आदी अनेक गावांतील वीज ग्राहक गेले चार दिवस अंधारात असून अधिकारी, कर्मचारी फोन बंद करून ठेवतात व केवळ भरमसाठ वीज बिले आकारून वसुली करतात आणि खंडित असलेल्या वीज पुरवठ्याची अधिकारी साधी दखल घेत नसल्याने अनेक गावांतील लोकांनी सावंतवाडीचे वीज अधिकारी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना घेराव घातला व वीज वितरण कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंधारात बसण्यास भाग पाडले. यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण साईट वर असल्याने सहा.अभियंता सावंतवाडी-२ श्री खोब्रागडे हे ग्रामस्थांना सामोरे गेले. त्यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी खोब्रागडे यांनी आपल्या निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे सांगताच तात्काळ उपकार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितले. यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण येताच त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर कमी दाबाने होणारा वीज पुरवठा, वाढीव बिले, लाईनमन, वायरमन नसणे, अधिकाऱ्यांचे सरकारी फोन बंद असणे, गावातील लोक मदतीला तयार असताना वीज वितरण कर्मचारी काम करण्यास दिरंगाई करतात, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी सरासरी बिले देत कायद्याचा भंग करणे, बंद मीटर, खंडित असलेला अनेक गावांतील वीज पुरवठा तात्काळ सुरू करणे आणि बांदा सेक्शन मधील सहा. अभियंता यादव यांची तात्काळ बदली करणे, बांदा सेक्शन मध्ये यादव पुन्हा दिसले नाही पाहिजेत अशा मागण्या करत प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांची देखील बोलती बंद झाली. बांदा सेक्शनचे अधिकारी यादव येताच ग्रामस्थ त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. समोरासमोर ग्रामस्थांनी यादव यांचा फोन बंद असल्याचे दाखवत त्यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली. यावेळी श्री.धोत्रे, सुनील नाईक, राहुल सावंत आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सबुरीची भूमिका घेत मध्यस्थी केल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा सचिव दीपक पटेकर, तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी देखील वीज अधिकाऱ्यांची भेट घेत उपरोक्त गावांतील वीज वितरण समस्येवर तात्काळ तोडगा काढून गावांमधील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली.

तांबोळी सरपंच सौ.वेदिका नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व तात्काळ आपल्या सोबत तांबोळी असनिये गावाला भेट देऊन समस्या जाणून घ्या आणि दोन दिवसात समस्यांचे निराकरण करा अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची परवानगी घेत गावात तात्काळ भेट देण्याचे कबूल करून ग्रामस्थांसह तांबोळी आदी गावांमध्ये भेट देण्यास गेले. यावेळी हेमंत दाभोलकर, मिलिंद देसाई, संजय सावंत, चंद्रकांत भिसे आदी तांबोळी, असनिये गावातील ग्रामस्थ, पत्रकार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी वीज वितरण व्यवस्था कोलमडण्याची कारणे सांगताना गेले काही दिवस सतत पाऊस आणि वारा असल्याने झाडे उन्मळून, मोडून विजेच्या तारांवर पडत आहेत त्यामुळे वीज खांब तुटून वीज वितरण व्यवस्था कोलमडते असे सांगतानाच ३३ के.व्ही. लाईन मध्ये बिघाड झाल्याने आणि जंगलमय भागातून वीज वाहिनी आल्याने बिघाड शोधण्यास उशीर होत असल्याचेही सांगितले. महावितरण सावंतवाडीकडे एकूण ७१ वायरमन व लाईनमन कर्मचारी असून पैकी २१ परमनंट आहेत, उर्वरित कंत्राटी असल्याने काम करताना अडचणी येत असल्याचे नमूद केले. कायमस्वरूपी कर्मचारी जबाबदारीने काम करतात, परंतु कंत्राटी कर्मचारी तेवढी जबाबदारी घेत नाहीत, फोन बंद करून ठेवतात, काही कनिष्ठ अधिकारी देखील बेजबाबदार वागतात त्यामुळे लोकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा