सावंतवाडी :
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले केसरकर यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच दिली. कु विराज राऊळ या विद्यार्थ्याने आपली काढलेली हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून मंत्री दीपक केसरकर खूप खुश झाले. त्यांनी कु. विराज राऊळ याच्या या पेन्सिल पोर्ट्रेट स्केच कलेचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली.
कु. विराज राऊळ याला पेन्सिल पोर्ट्रेट स्केचची आवड असून त्याने छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासह अनेकांची हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून अनेकांची वाहवा मिळवली आहे. कु. विराज राऊळ याला सावंतवाडीतील अस्मसा आर्ट अकॅडमीचे सत्यम मल्हार आणि अक्षय सावंत तसेच मिलाग्रीस हायस्कूलचे कला शिक्षक गणेश डिचोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.कु. विराज राऊळ याने शासकिय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड पटकावली असून यावर्षी तो इंटरमिजिएट परीक्षेला बसणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ११ वा तर सावंतवाडी तालुक्यात ५ वा क्रमांक पटकावित शिष्यवृत्ती प्राप्त केली. यावेळी कु. विराज राऊळ याचे वडील तथा ओटवणे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक नंदकिशोर राऊळ, आई सौ नेहा राऊळ, मामा तथा शिवसेनेचे माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर उपस्थित होते.