You are currently viewing स्मृति भाग ७५

स्मृति भाग ७५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

 *स्मृति भाग ७५*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

संस्कार वर्णनात गौतम ऋषिंनी चाळीस संस्कार व आठ आत्मगुण सांगून याशिवाय ब्रह्म्याच्या सायुज्यतेला वा सालोक्यतेला कुणीही प्राप्त करु शकत नाही . मग काय आहेत हे संस्कार व गुण ? पाहू तर मग .

गर्भाधान , पुंसवन विधी , सीमन्तोन्नयन , जातकर्म , नामकरण , अन्नप्राशन विधी , चूड़ाकरण , उपनयन , वेदांची चार व्रते , विद्या स्नान , पत्निप्राप्ति ( विवाह ) , पंचयज्ञानुष्ठान ( देवपितृमनुष्यभूतब्रह्मादि पंच यज्ञ ) , अष्टका — अमावस्या व पौर्णिमेस केले जाणारे पार्वण — श्राद्ध — श्रावणी — आग्रहायणी — चैत्रा आणि आश्वयुजी हे सर्व मिळून सात प्रकारचे पाकयज्ञ , आग्न्याश्रेय , अग्निहोत्र , दर्शपौर्णमास , आग्रयण , चातुर्मास्य , निरूढपशुबन्ध आणि सौत्रामणी हे सात प्रकारचे हविर्यज्ञ , अग्निष्टोम — अत्यग्निष्टोम — उक्थ्य — षोडषी —वाजपेय—अतिरात्र व अप्तोर्याम हे सात प्रकारचे सोमयज्ञ असे हे चाळीस संस्कार आहेत .

दया—क्षमा—अनसूया—शौच—शारिरीक व मानसिक श्रान्तिहानी , सर्वहित , कृपणतेचा अभाव आणि तृष्णेचा र्‍हास हे आठ गुण आहेत .

या संस्कार वर्णनात चार ही वर्ण , आन्तरिक चेतना असणारे , चालणारे , उडणारे आणि पुढे सरकणारे सर्व जीवांचे जीवन हे व्रत धारण करणार्‍या राजा व बहुश्रृत ब्राह्मण या दोघांवरच अवलंबून असते , हे निक्षून सांगितले आहे .

इथे राजा ही संज्ञा सर्वास माहित आहेच . पण बहुश्रृत ब्राह्मण कुणास म्हणावे ? हे ही सांगून ठेवले आहे .

जो लोकाचार , वेदवेदाङ्गास जाणणारा , वाकोवाक्य ( एक वेदांश ) — इतिहास—पुराण कुशल , त्यांची अपेक्षा करणारा , त्यांचे अनुसार आचरण करणारा , चाळीस संस्कारांनी संस्कृत , अध्ययन—यजन व दान ह्या तीन ही कर्मात अभिरत ( वा अध्ययन—अध्यापन—यजन—याजन—दान व आदान या षट्कर्मात अभिरत ) , स्मार्त कर्मात सुशिक्षित , काम—क्रोध—लोभ—मोह—अहंकार व मात्सर्य रहित , असा गुणसम्पन्न जो राजाकडून ही अवध्य वा वधास अयोग्य , ना बन्धनयोग्य , न बहिष्कार योग्य , न निन्दा वा परिहार योग्य , असा जो ब्राह्मण , तो *बहुश्रृत* ब्राह्मण !!

आता करत बसा विचार की आपण कुठल्या ब्राह्मण्यात बसतो त्याचा !! दोन मंत्र आले व परशुरामाचे नाव घेतले की ब्राह्मण्य समजणारे कित्येक भेटतात !!! ठीक आहे . पुढील भाग उद्या पाहूच .

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ?

 

इत्यलम् ।🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा