मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ११.२ षटकांत दोन गडी गमावून १०० धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार त्यावेळी ऑस्ट्रेलियाला ७२ धावसंख्या पुरेशी होती.परंतु कांगारू संघ २८ धावांनी पुढे होता. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना पुढे होऊ शकला नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने सहज विजय मिळवला.
डेव्हिड वॉर्नरने ३४ चेंडूत आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक झळकावले. तो ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून नाबाद राहिला आणि ग्लेन मॅक्सवेल ६ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला. आता भारतीय संघ सुपर-८ च्या ग्रुप-१ मध्ये अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. भारताची निव्वळ धावगती +२.३५० आहे, तर कांगारूंची +१.८२४ आहे. आता २३ जून रोजी होणाऱ्या सुपर-८ च्या पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. तर बांगलादेशचा संघ २२ जूनला भारताशी भिडणार आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १४० धावा केल्या. पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी विशेष कामगिरी केली. टी२० विश्वचषक २०२४ मध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याचबरोबर टी२० विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो सातवा खेळाडू आहे. टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा कमिन्स हा ब्रेट लीनंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. लीने २००७ च्या टी२० विश्वचषकात ही कामगिरी केली होती. कमिन्सने १८व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले होते. यानंतर कमिन्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहीदला बाद करून विशेष कामगिरी केली. कमिन्सशिवाय ॲडम झाम्पाने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कर्णधार शांतो आणि तौहीद यांच्याशिवाय बांगलादेशकडून एकही फलंदाज खेळला नाही. स्टार्कने पहिल्याच षटकात तनजीद हसनला (०) क्लीन बॉलिंग करून संघाला पहिला धक्का दिला होता. यानंतर लिटन दासने शांतोच्या साथीने ५८ धावांची भागीदारी केली, मात्र झम्पाने ही भागीदारी भेदली. त्याने लिटनला त्रिफळाचीत केले. त्याला १६ धावा करता आल्या. यानंतर रिशाद हुसेन दोन धावा करून मॅक्सवेलचा बळी ठरला. झांपाच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा कामी आली आणि त्याने शांतोला पायचीत टिपले. शांतोने ३६ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. शाकिब अल हसनला (८) स्टॉइनिसने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. महमुदुल्लाह दोन धावा करून तंबूमध्ये परतला आणि मेहदी खाते न उघडता परतला. तस्किन ७ चेंडूंत १३ धावा करून नाबाद राहिला आणि तनजीम हसन शाकिब ४ धावा करून नाबाद राहिला.
१४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात पावसामुळे सामना थांबवण्यात आला. मात्र, काही वेळाने पुन्हा सामना सुरू झाला. रिशाद हुसेनने सातव्या षटकात हेडला त्रिफळाचीत केले. २१ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावा करून तो बाद झाला. यानंतर कर्णधार मिचेल मार्शला रिशदने पायचीत बाद केले. त्याला एक धाव करता आली. त्यानंतर १२व्या षटकात सामना थांबला तोपर्यंत वॉर्नरने मॅक्सवेलसह ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला.
पॅट कमिन्सला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.