*वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन*
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचा सावळा गोंधळ सुरू असून जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकच नव्हेत तर औद्योगिक, व्यापारी, छोटे उद्योजक आदी सर्वच ग्राहक महावितरणच्या कारभाराला कंटाळले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या खाजगीकरणानंतर महावितरणचे अधिकारी गेंड्याची कातडी परिधान केल्यासारखे मुजोर झाले आहेत. ग्राहकांना दुरुत्तरे देणे, कोणाचीही किंमत न ठेवणे, कामात दिरंगाई करणे आदी कारणांमुळे अधिकाऱ्यांचा ग्राहक सेवेकडे दुर्लक्ष झाला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील कनिष्ठ अभियंत्यांची पाठराखण करत असल्याने जिल्ह्यातील वीज वितरणाची अवस्था दयनीय झाली आहे आणि वीज बिले मात्र भरमसाठ येत आहेत. जिल्ह्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने ग्रामपंचायत कार्यालय चराठे येथे सोमवार दिनांक १७ जून रोजी सायंकाळी ४.०० वाजता विभागातील वीज ग्राहकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी चराठे, माजगाव, कारिवडे, ओटवणे, सरमळे, दाभिल आदी विभागातील वीज ग्राहक उपस्थित राहतील अशी माहिती वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी दिली आहे.
महावितरणकडून वीज बिलापोटी ग्राहकांकडून भरमसाठ रक्कम वसुली केली जाते. वीज ग्राहकांच्या पैशातूनच बसविलेल्या मीटरवर वर्षानुवर्षे भाडे वसुली करतात, झाडे वेली न तोडल्याने होणारी वीज गळती, वीज वायर खांबांचे होणारे नुकसान ग्राहकांच्या माथी मरतात, त्याचबरोबर वीज बिलामध्ये अनेक छुपे आकार लावले जातात परंतु ग्राहकांना योग्य ती सेवा महावितरण कडून मिळत नाही. जुनाट सडलेले विद्युत खांब, जुनाट वीज वाहिन्या, कित्येक वर्षे लोटलेले कमी दाब क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आदिंमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे तर व्यापारी, उद्योजक आदींना बऱ्याचदा विद्युत उपकरणे नादुरुस्त होऊन मोठा फटका बसतो आणि मनस्ताप सहन करावा लागतो. महावितरण कडून उद्योजकांना औद्योगिक वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत परंतु त्यांच्याकडून वीज बिल आकारणी कमर्शियल पद्धतीने केली जाते. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांची देखील महावितरणकडून लूट सुरू आहे. मान्सूनपूर्व झाडे छाटणी, तोडणे आदी कामे करण्यासाठी जिल्ह्यात कागदोपत्री दाखविलेल्या कंत्राटदारांकडे मान्सूनपूर्व कामांसाठी माणसेच नसल्याने ती कामे झालेली नाहीत. परिणामी पावसाळ्यात वीज वाहिन्यांवरील झाडे न छाटल्यामुळे वीज वाहिन्यांवर वादळी वारे पावसाने झाडे पडून विजेचे खांब तुटून पडतात आणि गावागावात चार चार दिवस वीज पुरवठा खंडित होतो. कित्येक गावांमध्ये जुने ट्रान्सफॉर्मर व नव्याने वाढलेल्या वीज जोडण्या यांचा मेळ न बसल्याने सदरचे ट्रान्सफॉर्मर अकार्यक्षम बनतात आणि ग्राहकांना वीज बिले भरून देखील कमी दाबाने वीज पुरवठा होतो. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये दिसून येत आहे. महावितरण कडून केल्या जाणाऱ्या दिरंगाईमुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
महावितरणने प्रत्येक विद्युत ग्राहकाला प्रीपेड मीटर बसविण्याची योजना आखली असून लवकरच ग्राहकांवर प्रीपेड मीटरचे संकट येणार आहे. प्रीपेड मीटर पासून होणारे नुकसान अजून ग्राहकांच्या ध्यानात येत नसून ग्राहक निद्रिस्त अवस्थेत आहेत. अशा ग्राहकांमध्ये ग्राहक हक्काची माहिती देणे आणि ग्राहकांना स्वतःचे हक्क मिळविण्यासाठी जागृत करणे, महावितरण कडून अखंडित वीज पुरवठा करून घेणे इत्यादी विषयांवर जागृती करून ग्राहकांच्या वैयक्तिक व गाव पातळीवरील तक्रारी जाणून घेत त्यांच्या निवारणासाठी एकत्रित प्रयत्न करणे, वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा अहवाल सादर करणे, पाठपुरावा करणे आदीसाठी वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने ग्रामपंचायत कार्यालय, चराठा येथे विभागीय बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी चराठे, माजगाव, कारिवडे, ओटवणे, दाभिल, सरमळे आदी परिसरातील वीज ग्राहकांनी सदर बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.