*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पावसाळी शब्दशृंगार*
गाभाळल्या नभांगणी
ढग डोलवितो वारा
लढताना विजा संगे
कोसळती जलधारा…१
किनाऱ्याची घेता मिठी
उसळती उंच लाटा
आठवांच्या पावसात
बुडालेल्या पायवाटा…२
भेगाळूनी पसरली
तप्त मृदेची ओंजळ
थेंबातुनी ओघळता
धुंद झाली दरवळ….३
चिंब पावसात न्हाला
निळा आसमंत सारा
गारव्याची गात गाणी
सुसाटला रानवारा….४
फुलांतुनी सांडलेला
ओल्या श्वासातला गंध
अंकुरला मातीतून
हिरवा कोवळा कंद….६
पावसात भिजताना
शब्द शृंगारत जातो
ऋतू पावसाळी ओला
शब्द शब्द गान गातो…६
सौ. स्नेहा धोंडू नरिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग