You are currently viewing मडूरावासियांचा उन्मत्त महावितरण अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा एकजुटीने निर्धार

मडूरावासियांचा उन्मत्त महावितरण अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा एकजुटीने निर्धार

*वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले बैठकीत मार्गदर्शन*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणची वीज वितरण व्यवस्था दुसऱ्या कुणामुळे नव्हे तर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे खालावली असून ग्राहकांना अखंडित, सुरळीत, सुरक्षित वीज पुरवठा होण्यासाठी वीज ग्राहकांशी अरेरावी करत उद्धट वागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा मडूरा वासियांच्या विभागीय बैठकीत एकजुटीने निर्धार करण्यात आला. यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, तालुका सचिव संजय नाईक, सदस्य मंदार नाईक, नंदू परब, रामचंद्र राऊळ, सुरेश गावडे, बांदा व्यापारी संघाचे मंगलदास साळगावकर, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच कृष्णा गावडे, प्रवीण पंडित, सरपंच कास, प्रतीक्षा मांजरेकर,सरपंच सातोसे, रुपेश साळगावकर, उपसरपंच सातोसे आदी उपस्थित होते.

मान्सून पूर्व पावसाने महावितरणच्या बेजबाबदार कामांचा नमुना संपूर्ण जिल्ह्याला दाखवला. अनेक गावांमधील वीज चार पाच दिवस खंडित झाली होती. त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. महावितरण कडे मान्सून पूर्व करावयाची कामे करण्यासाठी जिल्ह्यात दोन कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत परंतु कित्येक गावांमध्ये हे कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत पोचले नाहीत किंवा अशा गँग असतात हे अनेक ग्राहकांना ज्ञात नाही. त्यामुळे कोणी महावितरणच्या व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवत नव्हता, परंतु गेले वर्षभर वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यापासून महावितरणच्या भोंगळ कारभाराला संघटनेने रस्त्यावर आणले आणि महावितरण अधिकाऱ्यांना त्यांची कामे काय आहेत हे दाखवून दिले. तरीही अधिकारी वर्ग एवढा मस्तवाल झाला आहे की ते सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्राहकांना उद्धट उत्तरे देतात, टोलवा टोलवी करतात. एकीकडे महावितरण ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आकारतात, वीज बिल उशिरा भरणा केल्यास वीज कनेक्शन तोडतात तर दुसरीकडे ग्राहकांना भरमसाठ वीज बिले देतात. वीज वितरण झाडे छाटणी न केल्याने वीज गळती होते ती सुद्धा ग्राहकांच्या माथी मारली जाते. त्यामुळे महावितरणच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून वीज ग्राहक संघटना सावंतवाडीने मडूरा विभागातील वीज ग्राहकांची बैठक श्री हनुमान मंदिर मध्ये आयोजित केली होती. यावेळी ग्राहकांना मार्गदर्शन करताना वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी ग्राहकांनी एकत्र येऊन वीज वितरणाच्या कारभाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, त्याकरिता प्रत्येकाने आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात महावितरणला सादर करून त्याची प्रत तालुका वीज ग्राहक संघटना कार्यकारिणीला द्यावी, म्हणजे आम्ही त्याचा पाठपुरावा करू तसेच आम्हाला बांद्रा मुंबई येथील प्रतापगड या मुख्य कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या कारभाराविरुद्ध दाद मागता येईल. त्याचप्रमाणे सरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायत मधील तक्रारींचे पत्र तयार करा आणि महावितरणला सादर करा असे सांगितले.

यावेळी ग्राहकांनी ११ केव्ही लाईन मडूरा भागातून पुढे आरोस पर्यंत जंगलातून गेल्याने अनेक अडचणी येतात, वारंवार वीज खंडित होते. त्याकरिता मुख्य लाईन रस्त्याच्या कडेने न्यावी अशी मागणी सर्वानुमुखे करण्यात आली. बांदा विभागातील सहा .अभियंता यादव हे कधीच फोन उचलत नाहीत, दुरुत्तर करतात या अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. नादुरुस्त मीटर वर्षानुवर्षे बदलत नाहीत, सरासरी बिल आकारून ग्राहकांचे कंबरडे मोडतात, नादुरुस्त मीटरची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न उपस्थित करत वीज ग्राहकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नापसंती व्यक्त करून एकत्रित लढा देण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी बैठकीला कृष्णा अमरे, पांडुरंग पंडित, सुभाष गावडे, आरोस मा.सरपंच केशव नाईक, मंदार वालावलकर, विद्याधर नाईक, वसंत धुरी, मा.सरपंच सातोसे, विनय वालावलकर, मा.उपसरपंच सातोसे, प्रसाद मांजरेकर, सुधीर नाईक, अमोल मेस्त्री, मोहन गवस, दत्त्ताराम परब, भानुदास सावंत, सदाशिव गाड, बाबल परब, अरुण परब, घन:श्याम गावडे, शंकर परब, शंकर जाधव, पत्रकार प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, यशवंत माधव, प्रकाश वालावलकर, दिनेश नाईक, प्रवीण नाईक गौरव परब, माधुरी वालावलकर, पांडुरंग (दाजी) सातार्डेकर, तुकाराम कांबळी, सिद्धेश नाईक, अरुण लक्ष्मण परब, गोपाळ महादेव सातार्डेकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा