नशाबंदी मंडळाचा कणकवलीतील तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप
मालवणी अभिनेत्री अक्षता कांबळी यांची कोकणातील व्यसनमुक्तीचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती
कणकवली
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी व्यसनमुक्तीचे कार्य, प्रचार आणि प्रसार जोमाने करण्यासाठी प्रसिद्ध मालवणी अभिनेत्री अक्षता कांबळी यांची कोकणातील व्यसनमुक्तीचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास यांनी आज केली.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्यातील सर्व जिल्हा संघटक, समन्वयकांची तीन दिवशीय कार्यशाळा कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे झाली. यात आगामी वर्षभरासाठी नशाबंदी मंडळाच्या कामाची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. या बैठकीला यावेळी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र येथून नशाबंदी मंडळाचे संघटक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या समारोपाला प्रमुख पाहूणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंती अजयकुमार सर्वगोड उपस्थित होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास, नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडामे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, नशाबंदी मंडळाच्या कोकण संघटक अर्पिता मुंबरकर, पत्रकार महेश सरनाईक आदी उपस्थित होते. नशाबंदी मंडळाच्या अध्यक्षा वर्षा विद्या विलास यांनी व्यसनमुक्ती मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी नशाबंदी मंडळाच्या उपक्रमांचे काैतुक केले.