You are currently viewing किंगमेकर दीपक केसरकरच……

किंगमेकर दीपक केसरकरच……

*किंगमेकर दीपक केसरकरच….*

*जय आणि पराजय.. यामध्ये कुणी असेल तर ते दीपकभाई*

*विशेष संपादकीय…*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा बाजी मारणार आणि हॅट्रिक साधणार अशी अटकळ अनेकांनी बांधली होती, परंतु विनायक राऊत यांच्या विरोधात दोनवेळा चिरंजीव डॉ. निलेश पराभूत झाले तरी बाप हा बापच असतो याचा प्रत्यय नारायण राणे यांच्या विजयाने आला. तिसऱ्या वेळी दोन लाखांचे मताधिक्य घेणार आणि विजय मिळवणार अशी दर्पोक्ती करणाऱ्या विनायक राऊत यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आणि कोकणातील शिवसेनेची (उद्धव ठाकरे गट) ताकद कमी झाल्याची प्रचिती आली. या सर्व घडामोडीत राणेंचे पराभव आणि आजचा विजय या दोन्हींमध्ये एक व्यक्ती प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे सावंतवाडीचे नाम.दिपक केसरकर..!
राणेंचे झालेले दोन्ही पराभव हे केसरकर राणेंच्या विरोधात असताना झालेत आणि आजचा विजय हा केसरकर राणेंच्या सोबत असताना मिळाला आहे. त्यामुळे केसरकर हे राणेंच्या विजयात किंगमेकर ठरले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तब्बल दीड लाखांच्या फरकाने विजय मिळवित शिवसेनेची ताकद दाखविली होती. २०१४ मध्ये राणेंच्या विरोधात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून दिपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत विनायक राऊत यांना तब्बल ४१००० चे मताधिक्य सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मिळवून देत किंगमेकर ठरले होते. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा केसरकरांनी आपली छाप पाडत विनायक राऊत यांना २९००० चे मताधिक्य देत सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे विनायक राऊत यांचे विजय सुकर झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी केसरकरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने त्यांच्यावर टिपण्णी करत आपण सहज विजयी होणार अशा वल्गना केल्या होत्या. परंतु “जिथे दिपक केसरकर तिथे विजय..!” हे समीकरण सिद्ध होताना दिपक केसरकर हे राणेंच्या राशीला फलदायी ठरल्याचे दिसून आले आणि यावेळी देखील दिपक केसरकरांनी आपल्या अथक प्रयत्नांनी सावंतवाडी मतदारसंघातून नारायण राणेंना तब्बल २८००० पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे दिपक केसरकर हे पुन्हा एकदा किंगमेकर ठरल्याचे बोलले जात आहे.
केसरकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा नारायण राणे यांनाच द्या अशी मागणी केली होती त्याचबरोबर नारायण राणे यांनी केसरकरांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपल्यात कोणतेही वाद नसून केसरकर हे प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करतील असा आशावाद व्यक्त केला होता आणि नाम.केसरकरांनी राणेंच्या विश्वासाला पात्र ठरत मतदारसंघात गावागावात प्रचारफेरी काढत राणेंच्या विजयासाठी जंग जंग पछाडले होते. सावंतवाडी शहरात तर भर दुपारच्या कडाक्याच्या उन्हात स्वतःच्या वयाची पर्वा न करता बाजारपेठेतून “एकला चलो” म्हणत प्रचार केला आणि राणेंच्या विजयासाठी जनतेला साकडे घातले होते याचे अनेक साक्षीदार आहेत. जिथे राणेंचे निकटवर्ती प्रचारापासून दूर होते तिथे केसरकर कधी स्वतःचा देखील प्रचार केला नसेल एवढा प्रचार नारायण राणेंचा करत होते हे मात्र नक्कीच कौतुकास्पद..! परंतु इतकी वर्षे राणेंचे विरोधक म्हणून वावरले असताना केसरकरकरांच्या सांगण्यावरून मतदारसंघातील जनता राणेंना मतदान करणार का..? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आलेल्या निकालात राणेंना सावंतवाडी मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य नक्कीच केसरकरांचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे यात शंकाच नाही.
विनायक राऊत हे कोकणातील असले तरी जेव्हा पहिल्यांदा लोकसभा लढविली तेव्हा कोकणातील मतदारांसाठी ते अनोळखी होते. परंतु शिवसेनेचं चिन्ह आणि दिपक केसरकर यांच्यासारख्या प्रामाणिक लोकप्रतिनिधींची साथ त्यांना विजयाच्या नौकेवर स्वार होण्यासाठी कारणीभूत ठरली होती. परंतु ज्या काडीचा आधार घेतला तिलाच विसरणाऱ्या विनायक राऊत यांना आजच्या पराभवात सुटलेल्या काडीचा आधाराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. केसरकर पालकमंत्री असताना त्यांची केलेली अडवणूक, शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी दिपक केसरकर यांना मंत्रिपद मिळू नये यासाठी कोणी कोणी उद्धव ठाकरे यांचे कान फुंकले होते हे देखील केसरकर विसरले नसतील आणि आजच्या पराभवानंतर विनायक राऊत सुद्धा विसरणार नाहीत.. हे सुद्धा तितकेच खरे. एकीकडे केसरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीस नारायण राणेंनी केलेल्या मदतीची परतफेड केली तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी केलेल्या छुप्या कारवायांचा बदला घेतला असे म्हणायला हरकत नाही. पण ..
“जय आणि पराजय यामध्ये जर कोणी असेल तर ते दिपक केसरकर” हे मात्र नक्की..!

प्रतिक्रिया व्यक्त करा