You are currently viewing मनस्पर्शी परिवाराचे दैदीप्यमान कवी संमेलन

मनस्पर्शी परिवाराचे दैदीप्यमान कवी संमेलन

पुणे :

 

दिनांक १८ मे रोजी डॉ. सौ. निलांबरीताई गानू यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेले मनस्पर्शी साहित्य परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, शिवाजीनगर, पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडले.

कवी संमेलनाला लाभलेले संमेलनाध्यक्ष – मा. चंद्रकांत दादा वानखेडे (ज्येष्ठ साहित्यिक), उद्घाटक – मा. बबन धुमाळ (प्रसिद्ध गझलकार), प्रमुख अतिथी मा. रवींद्र यशवंतराव देशमुख (प्रसिद्ध गझलकार व वास्तुशास्त्रज्ञ), स्वागताध्यक्ष – मा. प्रा.विजय काकडे (‘वास्तवातील कथा फेम’ लेखक), उत्सवमूर्ती – डॉ. सौ. निलांबरी गानू (कादंबरीकार) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, भरजरी शेला, आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि समूहाची प्रस्तावना आपल्या सुंदरशैलीत समूहाच्या अध्यक्षा कु. मानसी पंडित यांनी सर्वांसमोर प्रस्तुत केली. मा. बबन धुमाळ यांनी उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे घोषित करून आपल्या बहारदार आणि अभ्यासपूर्ण मनोगताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या गझलेने सर्वांची मने जिंकून घेतली. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्री. रवींद्र यशवंतराव देशमुख यांनी आपल्या मनोगतात साहित्याप्रती असलेली सद्भावना आणि पुढे नेण्याची जिद्द व्यक्त केली.

मनस्पर्शी परिवाराच्या समन्वयक व संमेलनाच्या उत्सव मूर्ती – डॉ. सौ. निलांबरी गानू यांनी केलेल्या कार्याची दखल नासाने सुद्धा घेतलेली आहे. त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे. अहिल्याबाई होळकरांवर लिहिलेली त्यांची कादंबरी जगप्रसिद्ध आहे. उत्सव मूर्तींनी सर्व साहित्यिकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तसेच मनस्पर्शी परिवाराबद्दल असलेले स्नेह आपल्या साश्रू नयनांनी व्यक्त केले. त्यांची बहारदार लावणी सर्वांना तालावर नाचायला उत्स्फूर्त करत होती. स्वागताध्यक्ष श्री विजय काकडे यांनी त्यांची “आव्हान देत जाणार काल मीच होतो ” ही बहारदार गझल आपल्या सुरेल आवाजात सादर करून मैफालीत रंगत आणली तसेच कथा आणि कथेचे महत्व सर्वांना पटवून दिले व निखिल कोलते यांच्या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनस्पर्शी परिवाराच्या सर्व प्रशासकांच्या कार्याची प्रशंसा मुक्तकंठाने केली. निखिल कोलते यांच्या कथासंग्रहाला विजय काकडे सरांचीच सुंदर व सखोल प्रस्तावना लाभलेली आहे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

साहित्य क्षेत्रातील ‘ बाप माणूस ‘तसेच या संमेलनाला लाभलेले अध्यक्ष श्री.चंद्रकांतदादा वानखेडे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द हा सहजरीत्या प्रत्येक साहित्यिकाच्या काळजात उतरत होता. त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांचा साहित्याशी असलेला संबंध आणि इतिहास सर्वांसमोर स्पष्टपणे मांडला. ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोतावर्गाला आणि साहित्यिकाला त्यांची भाषण शैली आणि झुंजार व्यक्तिमत्व टाळ्यांचा गडगडाट करायला प्रवृत्त करीत होते.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कु. निखिल प्रमोद कोलते यांच्या “मनातलं न्यायालय” या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कवी राजेश नागुलवार उर्फ राजमन रा. चंद्रपूर यांच्या “मनभावन प्रभात” या चित्र चारोळी संग्रहाचे सुद्धा प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले

मा. मानसी पंडित,मा. सोनाली जगताप, मा‌ जयश्री शेळके, मा. सौ.संपदा देशपांडे यांनी कथासंग्रह आणि चारोळी संग्रहबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच समुहाच्या उज्वल वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन केले.

निखिल कोलते यांच्या भगिनी तसेच मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या अध्यक्षा कु. मानसी ताई पंडित यांनी एक सुंदर शुभेच्छापत्र सादर केले होते.

निखिलच्या आई यांनीही या पुस्तकासाठी निखिल ची मेहनत, आजवरच्या संघर्षाचे वर्णन आपल्या शब्दांत केले.

त्यानंतर एकामागून एक कवींच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक साहित्यिकांच्या कवितेत इतका जोश आणि स्फूर्ती भरलेली होती की श्रोतावर्ग हा मंत्रमुग्ध होऊन गेला. सादरीकरणाच्या पहिल्या सत्रात कवयित्री राजश्री सोले, मीना राजपूत, जयश्री चौधरी, शुभा खांबेकर पाणसरे, विवेक जोशी, रविंद्र गाडगीळ, मंजुषा चिटटवार, भाग्यश्री खुटाळे, पुरुषोत्तम इंगळे, रीमा गुमास्ते या कवी कवयित्रींचे सादरीकरण घेण्यात आले. मंजुषा चिटटवार यांनी उत्सवमूर्ती निलांबरी गानू यांच्यावर कविता सादर करून त्यांना भावूक करून टाकले. कवी पुरुषोत्तम इंगळे यांनी कट्ट्यावर मित्रांसोबत सिगरेट पिणाऱ्या मुलीची अवस्था आपल्या कवितेतून व्यक्त केली.

कविता सादरीकरणाच्या दुसऱ्या सत्रात कवी साजन पिलाणे, प्रांजली हारकूड, सरोज करंदीकर भिडे, योगिता तकतराव, ऋचा पत्की, अर्चना मानकर, नागोराव सोनकुसरे, उमाकांत आदमाने, अरुण पुराणिक, सुभाष कटकदौंड, सौ. प्रतिभा कुलकर्णी, मानसी पाटिल, अंबादास ठाकूर, ऋचा पारेख, सरोज शेवडे, आदिती पटवर्धन, शिल्पा चऱ्हाटे, रचना वासेकर, मधुरा कर्वे, वनिता पाटील, सुभाष मोहनदास, मोहन जुंदळे गुरूजी, पंडित वराडे, सुमित हजारे, गिरीश वसेकर, रामचंद्र खाडे, अद्विता पुष्कराज कुलकर्णी (७ वर्षे), पुष्पा सदाकाळ, विणा व्होरा, अनघा गुप्ते, श्यामल पाटील, दिपाली घाडगे असे एकामागे एक सर्व साहित्यिकांचे सादरीकरण झाले. गझलकार सुभाष कटकदौंड यांनी ‘बायको’ या शीर्षकाच्या अंतर्गत घेतलेली कविता प्रत्येकाच्या मनातील बायकोचे प्रतिबिंब समोर दर्शवत होती. कवयित्री सुनिषा कुलकर्णी यांची नात केवळ सात वर्षे वयाची कु.अद्विता पुष्कराज कुलकर्णी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिने सायंटिस्टवर आधारित सादर केलेली कविता सर्वांना साहित्याच्या भविष्याबाबत निश्चिंत करीत होती. कवयित्री वीणा व्होरा यांनी स्त्रीच्या स्वातंत्र्यावर घातल्या गेलेला पुरुषत्त्वाचा व अहंकाराचा धोंडा सर्वांसमोर फोडून काढला.

मनस्पर्शी परिवाराच्या वर्षभरात घेण्यात आलेल्या साप्ताहिक व मासिक उपक्रमाच्या विजेत्यांचा गद्य तसेच पद्य विभागातील पुरस्कार वितरण सोहळा सुद्धा या संमेलनात घेण्यात आला. या सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. वनिता पाटील, अंजना कर्णिक, किरण वेताळ, मनिषा पाटील, डॉ. सुभाष कटकदौंड, सौ. वीणा व्होरा, सौ. योगिता तकतराव, सौ. सुनिता कपाळे, रिया पवार, विजया भांगे, जयश्री चौधरी, सरोज शेवडे, श्यामल पाटील-अग्रवाल, स्मिता उधळीकर, सीमा रिसबूड, रिमा गुमास्ते याप्रमाणे सर्वांना विजेते होण्याचा आनंद अनुभवायला मिळाला.

समूहाचे संस्थापक निखिल कोलते व अध्यक्षा मानसी पंडित यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा जयश्री शेळके व सहसंचालिका सौ संपदा देशपांडे यांनी उत्तमरीत्या निवेदन करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला.

कार्यकारिणी सदस्य किरण वेताळ यांनी संमेलन यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. मानसी पंडित, निखिल कोलते यांचे, जयश्री शेळके यांचे कुटुंबीय सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.श

मा.हसीमा प्रसादे, मा. आद्या देशपांडे व मा. सौ. सोनाली जगताप यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा