You are currently viewing मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतीपदांवर शिवसेनेचे वर्चस्व…

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतीपदांवर शिवसेनेचे वर्चस्व…

बांधकाम – मंदार केणी, आरोग्य – दर्शना कासवकर, महिला बालकल्याण सभापतिपदी –  शीला गिरकर यांची बिनविरोध निवड…

मालवण

मालवण पालिकेच्या आज झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शीला गिरकर तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली.
दरम्यान तिन्ही विषय समित्यांवर शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे. विषय समित्यांवर अन्य सदस्यांची निवड न झाल्याने सर्व अधिकार हे स्थायी समितीस असणार आहेत. परिणामी स्थायी समितीवरही शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे.
मालवण पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी आज सकाळी पालिकेत प्रांत तथा पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, पूजा करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, जगदीश गावकर, दीपक पाटकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, पंकज सादये आदी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बांधकाम, नियोजन विकास समिती सभापती पदासाठी मंदार केणी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांना सूचक सेजल परब तर तृप्ती मयेकर अनुमोदन दिले. महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शीला गिरकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांना सूचक नितीन वाळके तर यतीन खोत यांनी अनुमोदन दिले. आरोग्य, पर्यटन, सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी दर्शना कासवकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांना सूचक पंकज सादये तर आकांक्षा शिरपुटे यांनी अनुमोदन दिले. प्रत्येकी एक सदस्याने उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे अर्ज वैध ठरवून त्यांची बिनविरोध निवड प्रांत खरमाळे यांनी जाहीर केली. पाणी पुरवठा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष राजन वराडकर तर सदस्य म्हणून माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवक तसेच पालिकेचे ठेकेदार उमेश मांजरेकर, किशोर तळाशीलकर यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजप यांच्यात दुफळी निर्माण झाली होती. यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे गटनेते मंदार केणी यांनी यतीन खोत, शीला गिरकर, दर्शना कासवकर या नगरसेविकांना सोबत घेत शिवसेनेत प्रवेश केला. यात या नव्या गटातील यतीन खोत यांची गतवर्षी बांधकाम सभापती म्हणून निवड झाली तर यावेळच्या निवडणुकीत मंदार केणी, शीला गिरकर व दर्शना कासवकर या तिघांचीही वर्णी लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =