You are currently viewing ⛳किल्ले हनुमंतगड⛳

⛳किल्ले हनुमंतगड⛳

*⛳किल्ले हनुमंतगड⛳*

सिंधुदुर्गात मोजकेच गिरीदुर्ग आहेत. त्यातील अनेक छोट्या मोठ्या लढायांचा साक्षीदार असणारा किल्ला म्हणजे किल्ले हनुमंतगड. दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात सदर किल्ला आहे. दोडामार्ग तालुक्यातील आवाडे कोट व मणेरी कोट ज्यादिवशी पहिला त्यादिवशी हा किल्ला वेळेअभावी बघता आला नाही. इलेक्शन ड्युटी संपली आणि लगेचच समिल भाईला कॉल केला की उद्या सकाळीच जाऊया का हनुमंतगडावर? त्यांनी क्षणाचा विलंब न लावता होकार दिला. नियोजनाप्रमाणे  दिनांक ८ मे २०२४ रोजी सकाळीच आम्ही फुकेरीकडे निघालो. बांदा – विलवडे – तांबूळी मार्गे फुकेरीला पोहचलो. फुकेरीतून गडाकडे डांबरी रस्ता गेलाय. रस्त्याने जाताना मध्येच मोरीचे काम सुरु असल्याने पुढे चालतच जावे लागले.

महादरवाजा, शिवस्मारक, पिशादेवी दगड बघत बारामाही पाण्याच्या टाक्याकडे आलो या बारामाही पाण्याच्या टाक्याच्यामध्ये सध्या पाणी नाही परंतु ओलसरपणा आहे. पुढे तटबंदी बघत गडाच्या पूर्वेच्या टोकावर आलो. त्यानंतर उजवीकडे दक्षिणेकडील तटबंदीच्या कडेने चालताना पुढे काही कोरडे तलाव लागले. त्यानंतर आम्ही गडाच्या दिंडी दरवाज्याकडे पोहचलो. इथे दरवाज्याकडे व देवडीमध्ये काही छायाचित्रे काढली. पुढे पश्चिमकडे निघताना वाटेत एक तोफ दिसते. या ही वाटेत काही छोटे कोरडे तलाव लागतात. उजवीकडे असलेल्या झाडीत काही अवशेष असण्याची शक्यता आहे परंतु वेळेअभावी या जंगलात फिरता आले नाही. चार किलोमीटरची गडभ्रमंती करून पुन्हा शिवस्मारकाकडून दरवाज्यामार्गे परतीच्या प्रवासाला लागलो.

गडाचा इतिहास पाहता हा गड सावंतवाडीचे दुसरे फोंड सावंत उर्फ अण्णासाहेब यांच्या काळात, म्हणजेच १७०९ ते १७३८च्या दरम्यान बांधण्यात आला. १७८७मध्ये करवीरकरांनी सावंतांकडून हनुमंतगड जिंकला. त्याला मोर्चेल प्रकरण कारणीभूत होते; पण त्यांनी लगेच एक तह करून १७९३मध्ये हा किल्ला परत सावंतांकडे सोपविला. पुढे १८०४मध्ये सावंतांमध्ये अंतर्गत कलह झाला. त्याचे असे झाले, तिसऱ्या खेम सावंतांना दुर्गाबाई व लक्ष्मीबाई या दोन पत्नी असूनही मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी सावंतवाडी संस्थानचा कारभार मोठी पत्नी लक्ष्मीबाईच्या नावे केला; पण सोम सावंत व श्रीराम सावंत हे सावंत घराण्यातील दोघे वारसदार (थोरले फोंड सावंत यांचे चिरंजीव) लक्ष्मीबाईंनी आपल्याच मुलाला दत्तक घ्यावे, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, लक्ष्मीबाई दोघांनाही दाद देत नव्हती. अशा वेळी काहीही करून गादी मिळवायचीच, असा विचार करून सोम सावंतांनी कट रचला; पण तो फसला. तेव्हा अपयशाने व भीतीने त्यांना ग्रासले. वाडीकोटाला वेढा घातलेला श्रीराम सावंत आपल्याला ठार मारणार, असे वाटल्याने त्यांनी आपल्या कुटुंबातील १८ माणसांसह आगीत आत्मसमर्पण केले. तेव्हा वडिलांना मदत मिळविण्यासाठी यशवंतगडावर गेलेला त्यांचा मुलगा फोंड सावंत तेथे नसल्यामुळेच केवळ बचावला. त्यांचा मुलगा असणाऱ्या फोंडर सावंतांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी करवीरकरांची मदत मागितली. त्यांच्या मदतीने त्यांनी संस्थानात धुमाकूळ घातला. म्हणून शेवटी लक्ष्मीबाईंनी त्यांना उत्तराधिकारी नेमण्याचे ठरवले; पण श्रीराम सावंतांना हे मान्य झाले नाही. त्यांनी बांद्याचा कोट व हनुमंतगड स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यांनी बांद्याला चंद्रोबा, तर हनुमंतगडावर जैतोबा यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली. श्रीराम सावंत यांच्या या सगळ्या कारवाया बघून फोंड सावंत, लक्ष्मीबाई, दुर्गाबाई, जानराव निंबाळकर यांनी सैन्य जमवले व श्रीराम सावंत यांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. कावेबाज लक्ष्मीबाईंनी फोंड सावंत यांना श्रीराम सावंत यांच्यावर हल्ला करण्यासाठी उत्तेजन दिले. वागडोळा या ठिकाणी दोन्ही सैन्याची गाठ पडली; पण त्यात फोड सावंतांचाच पराभव झाला. वेशांतर करून ते कसेबसे आकेरीला पळून गेले. या लढाईत तिसऱ्या खेम सावंतांची दुसरी पत्नी दुर्गाबाई श्रीराम सावंतांच्या तावडीत सापडल्या. तेव्हा त्यांनी दुर्गाबाईना कैद करून काही काळ हनुमंतगडावर कैदेत ठेवले; पण लगेचच सावंतवाडीत हलवले. दरम्यानच्या काळात करवीरकरांच्या वतीने रत्नाकरपंत राजाज्ञा यांनी लक्ष्मीबाईंकडून हनुमंतगड व इतर किल्ले जिंकले होते.

१८०७ मध्ये करवीरकर छत्रपतींच्या आव्हानापुढे अप्पासाहेब निपाणीकर व अप्पाजी सुबराव घाटगे कागलकरांनी सावंतवाडी संस्थानला वाचवले; मात्र त्यातून नवी समस्या उद्भवली. निपाणीकरांसाठी त्यांचा सरदार आबाजी राणे यांनी सावंतवाडीकर संस्थान बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वप्रथम त्याने संस्थानच्या ताब्यातील किल्ले जिंकले. पैशांसाठी त्याने संस्थानच्या कुटुंबीयांचा छळ सुरू केला. दरम्यान, संस्थानाधिपती अल्प वयाच्या रामचंद्र उर्फ भाऊसाहेब यांचा झोपेत खून झाला. पुढे १८०८मध्ये लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला, तेव्हा दुर्गाबाई राज्यकारभार पाहू लागल्या.

दुर्गाबाई मुत्सद्दी व न्यायी होत्या. इंग्रजांनीही त्यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केलेली दिसते. त्यांनी राज्यकारभार हाती घेतल्या घेतल्या सर्वप्रथम संस्थानामध्ये वाढलेला बेबनाव दूर करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी जागोजागी विखुरल्या गेलेल्या सरदारांना एकत्र करून त्यांना राज्यहिताच्या चार गोष्टी सांगितल्या. आपापसांतील द्वेष, कलह मिटविला. परिणामी, सैन्यामध्ये पसरलेले शैथिल्य व दुर्बलत्व नाहीसे होऊन त्याऐवजी शौर्य निर्माण झाले. चंद्रोबा सुभेदारने हनुमंतगडाला वेढा देऊन अप्पाजी सुबरावला हुलकावणी दिली. हा वेढा उठवण्यासाठी तो मोठे सैन्य घेऊन हनुमंतगडाकडे निघाला. तेव्हा चंद्रोबाने फुकेरीच्या घाटात अप्पाजीचा दारूण पराभव केला व हनुमंतगड जिंकला. एवढ्यावरच न थांबता इतर अनेक ठाण्यांबरोबरच त्याने एप्रिल १८१०मध्ये फार परिश्रम न करता वाडीचा कोट पुन्हा एकदा संस्थानच्या ताब्यात आणला. या महत्त्वपूर्ण सत्तांतरात हनुमंतगडाची भूमिका निर्णायक ठरलेली दिसते.
१७४२मध्ये जेव्हा संस्थानचा भरभराटीचा काळ होता, तेव्हा त्यांच्या ताब्यात सात भुईकोट व आठ किल्ले होते; मात्र १८३२मध्ये वाडी, कुडाळ, बांदे व आवाडे हे चार कोट आणि नारायणगड, नरसिंहगड व हनुमंतगड हे तीनच किल्ले संस्थानकडे राहिलेले दिसतात. या वेळी किल्ल्यांच्या खर्चासाठी गावांतून तनखा तोडून देण्याची पूर्वीची पद्धत बंद झालेली दिसते; तसेच किल्ल्यांवरील वस्तीही कमी झालेली दिसते. त्यांनी चंद्रोबा सुभेदार, संभाजी गोविंद सावंत इत्यादी सावंतवाडीतील सर्व सरदारांना एकत्र करून सर्वप्रथम सैन्य मजबूत केले. १८३२पर्यंत हनुमंतगड सावंतवाडीकरांच्याच ताब्यात राहिला. त्या वेळी दोन कुणबिणी, २७ हरकामे, दोन कीर्तनीबुवा, तीन कारकून, ८० गडकरी व किल्लेदार हनुमंतगडावर वास्तव्याला होते. त्यांच्या खर्चासाठी ३००० रुपयांची नेमणूक केलेली होती.

१८३८मध्ये ब्रिटिशांनी वाडी संस्थानचा कारभार हाती घेतल्यानंतर पूर्वीच्या व्यवस्थेत फेरफार करण्यास सुरुवात केली. वसुलाची व खर्चाची शिस्त लावली. हा कारभार चालविण्यासाठी त्यांनी रिचर्ड स्पुनर याची पॉलिटिकल सुपरिटेंडंट म्हणून नियुक्ती केली. ब्रिटिशांचा हस्तक्षेप सहन न झाल्याने राज्यात ५ नोव्हेंबर १८३८ रोजी संस्थानमध्ये मोठे बंड उभे राहिले. आत्मो चौकेकर यांच्या नेतृत्वाखाली हे बंड सुरू झाले. रिचर्ड स्पुनरचे मदतनीस व संस्थानचे मूळ कारभारी मोरोकृष्ण लेले यांना बंडवाल्यांनी पकडले व सावंतवाडीच्या कोटात ठेवले. धान्यकोठीची कुलपे तोडून बंडवाल्यांनी लोकांना धान्य वाटले. बंडवाल्यांनी खेम सावंत चौथे उर्फ बापूसाहेब यांना पळवून त्यांच्या नावाने कारभार चालवण्याचे ठरविले होते; मात्र रिचर्ड स्पुनरने अगदी कमी कालावधीत या बंडाचा बीमोड केला. आत्मो चौकेकर व त्याच्या साथीदारांनी कोटाच्या तटावरून तळ्यात उड्या टाकल्या व ते पसार झाले. परिणामी, बंडवाल्यांची इंग्रजांविरुद्धची चीड आणखी वाढली. १९ डिसेंबरला चौकेकराने गोव्यातील व वाडी संस्थानातील लोकांना एकत्र करून हनुमंतगड जिंकला. सावंतवाडीचा कोट घेण्यासाठी त्याने ठिकठिकाणी मेटे धरून नाकेबंदी केली. दुर्दैवाने, फितुरीमुळे हे बंड फसले. चौकेकराला अटक होऊन काळ्या पाण्याची शिक्षा झाली. परत कोणी बंड करू नये म्हणून त्यांनी किल्ल्याच्या दरवाजाची व किल्ल्यावरील वास्तूंची तोडफोड केली. (संदर्भ : मालवणी मुलखातील इतिहासाचे पाहारेकरी – संदीप भानुदास तापकीर )

*गणेश नाईक*
📱९८६०२५२८२५
*🚩दुर्ग मावळा परिवार🚩*

प्रतिक्रिया व्यक्त करा