You are currently viewing महायुतीच्या युतीमध्ये पडलाय मिठाचा खडा…..

महायुतीच्या युतीमध्ये पडलाय मिठाचा खडा…..

*महायुतीच्या युतीमध्ये पडलाय मिठाचा खडा…..*

*रत्नागिरीत नाम.उदय सामंत यांचाच कार्यालयावरचा बॅनर उतरविला*

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणवर अलोट प्रेम केले आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकणवासीयांनी शिवसेनेला भरघोस मतदान करून प्रेमाची परतफेड केली आहे. त्यामुळेच कोकणात शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी गावागावात पोचली होती. आणि अगदी तळागाळातील मतदार धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून नि:संकोचपणे शिवसेनेला मतदान करत होते. परंतु महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली आणि शिवसेनेमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे यांना मशाल तर शिंदे गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. ज्या वेळेपासून शिवसेनेच्या शिंदे गटाकडे धनुष्यबाण चिन्ह आले तेव्हापासून रत्नागिरीचे नाम.उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू उद्योगपती किरण सामंत यांनी धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा लढविणार असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले होते, त्याचबरोबर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून मोठमोठे होर्डिंग सुद्धा लागले होते. भाजपाने “अबकी बार 400 पार” असा नारा देत शिवसेनेकडे गेली अनेक वर्ष असलेला पूर्वीचा राजापूर व आत्ताचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ आपल्या ताब्यात घेऊन नाम.नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. तिथूनच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात वरवर सर्वकाही आलबेल दिसलं तरी महायुतीच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याचे रत्नागिरीत घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.
रत्नागिरी येथील नाम.उदय सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचा बॅनर हटवून त्यांचे जेष्ठ बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांचा बॅनर लावल्याचे दिसून आले. वरवर पाहता सदरची घटना ही सर्वसामान्य घटना असल्यासारखे जरी दिसले किंवा उदय सामंत यांनी कितीही कारणे देत भावाभावांमध्ये मतभेद नसल्याचे किंवा समजुतीने सोडविणार असल्याचे म्हटले तरी नारायण राणे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा ठरू शकते. राजकारणात नेते एकमेकांच्या विरोधात लढतात टीकाटिप्पणी करतात आणि परिस्थितीनुसार पुन्हा एकत्र सुद्धा येतात परंतु अशावेळी त्या नेत्यांचे कार्यकर्ते काय करतात..? हे महत्त्वाचे असते. गेली अनेक वर्षे शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरोधात अनेकदा कठोर भूमिका घेतली, त्यांना अनेक विशेषणे लावून निंदानालस्ती केली हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अशावेळी मूळ शिवसेनेतील शिवसैनिक जरी शिंदे यांच्यासोबत बाहेर पडला तरी नारायण राणे यांच्या बद्दल त्याच्या मनात आस्था असेलच हे कोणीही सांगू शकणार नाही. अशावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून गेले एक दीड वर्षभर भावी खासदार म्हणून शिवसेनेने ज्यांची ओळख करून दिली त्या किरण उर्फ भैय्या सामंत यांना ऐनवेळी लोकसभेच्या निवडणुकीतून बाजूला सारल्याने केवळ किरण सामंत यांचेच कार्यकर्ते नव्हे तर उदय सामंत यांच्यासाठी झटणारे रत्नागिरीतील शिवसैनिक नक्कीच नाराज असतील याबद्दल कोणतीही शंका नाही. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी खुद्द किरण सामंत यांचे छोटे बंधू नाम.उदय सामंत यांचा बॅनर हटवून किरण सामंत यांचा बॅनर त्या ठिकाणी लावला, याचाच अर्थ जरी महायुतीतील घटक पक्ष एकत्रपणे निवडणूक लढवत असले तरी किरण सामंत यांचे कार्यकर्ते मनातील धगधग जाहीरपणे दाखवून देत आहेत आणि याचा परिणाम नक्कीच रत्नागिरी मतदारसंघात नारायण राणे यांच्या घोडदौडीला ब्रेक लावणारा ठरणार तर नाही ना..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीचा धर्म पाळून नाम.उदय सामंत जरी आपल्या भावाला उमेदवारी न मिळाल्याचे शल्य जाहीरपणे बोलून अथवा दाखवून देत नसले तरी आतून मात्र ते सुद्धा दुखावले असल्याचे एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे नाम.नारायण राणे यांच्यासाठी कोण कोण प्रचाराच्या मैदानात उतरणार यापेक्षा मतदार संघातील मतदार त्यांना किती स्वीकारणार..? हे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड वैभववाडी कणकवली मतदार संघातील त्यावेळचे उमेदवार प्रमोद जठार यांच्या प्रचारासाठी कासार्डे येथे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन देखील प्रमोद जठार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता, हे सुद्धा विसरून चालणार नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ किंवा राज ठाकरे जरी प्रचारात उतरले तरी मतदार संघातील मतदारांचा कौल कुणाला आहे..? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा