*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महाराष्ट्र दिन*
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र माझा वीरपुरुषांचा
संताची भूमी विचारांची खाण
इतिहास त्याचा अभिमानाचा…
यशोगाथा संयुक्त महाराष्ट्राची
त्या हुतात्म्यांचा आज स्मरणदिन
कामगारांच्या कष्टांना वंदन
असे आज जागतिक कामगार दिन…
कधी वाटते नको नुसता इतिहास
आठवावा पराक्रम अन् बलीदान
नको नुसत्या वल्गना अस्मीतेच्या
राखावा मनाच्या एकजुटीचा मान..
हिंदुत्वाच्या नावे नुसती चिखलफेक
ऐकावे का आजच्या या पुण्यदिनी
मराठीशी मराठीची मारामारी
गिरवा की रे एकीचा धडा मनोमनी…
व्यर्थ न जावो हे बलीदान
तळमळतील रे आत्मे त्यांचे
पाहून हे दृष्य सत्ता लोभाचे
भरकटलेल्या मराठी मनांचे….
कशास लढले रक्त सांडले
कशी राखतो त्यांची आठवण
सभा सभांतूनी मूर्ख गर्जना
शिवाच्या वाटेवर कुठे आपण…
राधिका भांडारकर, पुणे