You are currently viewing जनतेचे प्रश्‍न सोडवले नाही तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल…

जनतेचे प्रश्‍न सोडवले नाही तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल…

कणकवली :

चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला. कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नांवर प्रांत कार्यालयात आमदार राणे यांनी प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर, माजी सभापती रत्नप्रभा वळंजू, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, रूपाली भांबुरे, संकेत खानविलकर, शैलेश सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

सुमारे २०० प्रकरणे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. मार्चपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जावीत. जेणेकरून जनतेला सातत्याने फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कणकवली प्रांताधिकारी ही प्रकरणे निकाली काढण्यास सकारात्मक प्रयत्न करीत आहेत; मात्र, त्यांना प्रशासकीय व इतर खात्यांतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने पाच, दहा वर्षे मोबदले अडकून असतील तर जनतेने काय करावे? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, तरी प्रशासन स्थरावर कामे होत नसतील तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =