You are currently viewing राणे केसरकर “राजकीय संघर्ष ते दिलजमाई..”

राणे केसरकर “राजकीय संघर्ष ते दिलजमाई..”

विशेष संपादकीय……

*राणे केसरकर “राजकीय संघर्ष ते दिलजमाई..”*

*समर्थकांची मने कशी जुळणार..?*

*कार्यकर्त्यांचे जीवन लाजिरवाणे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण गेले दीड दशक नारायण राणे व दीपक केसरकर यांच्या भोवती फिरत होते. सिंधुदुर्गात जवळपास तीन दशके नारायण राणे यांची एकहाती सत्ता होती. सर्वच स्वायत्त संस्था राणेंच्या अधिपत्याखाली होत्या. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात राणे हेच नाव अग्रस्थानी होते. राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाले तरी जिल्ह्यावर त्यांचेच वर्चस्व होते. पुढे स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यावर देखील राणेंना जिल्ह्यात कोणीही आव्हान दिले नव्हते. परंतु राणेंची कार्यपद्धती नाम.केसरकर यांच्या पचनी न पडल्याने दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. “राणेंचा राजकीय दहशतवाद” हा मुद्दा पुढे करून केसरकरांनी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर राणेंच्या विरोधात राळ उठवली. या राजकीय संघर्षात राणेंची जिल्ह्यावर असलेली तीन दशकांची सत्ता हादरली. राणेंना कधी नव्हे ते विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आणि मुंबईत एकाच वर्षात दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. यात आणखी भर पडली ती राणेंचे चिरंजीव डॉ.निलेश राणे यांना लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून दीड लाखांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. विनायक राऊत यांच्या विजयात खरा महत्त्वाचा रोल निभावला तो दीपक केसरकर यांनीच..!
नाम. केसरकरांच्या आणि राणेंच्या मधून विस्तव देखील जात नसतानाच राजकीय गणिते बदलली, राणेंनी भाजपा मध्ये प्रवेश केला. नाम. केसरकर हे भाजपाच्या जवळचे असल्याने शिवसेनेच्या (शिंदेगट) व भाजपाच्या युतीचे समन्वयक बनले. भाजपा शिवसेना युती झाल्याने लोकसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचे ठरले. शिवसेनेचा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर दावा असताना देखील शिवसेनेला डावलून भाजपाने मतदारसंघ आपल्याकडे राखला व नाम.नारायण राणेंना सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली. महायुतीचा धर्म पाळत शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी राणेंशी आपले वैयक्तिक वैर नव्हते व नाही असे सांगत दीपक केसरकर व नारायण राणे यांचे मनोमिलन झाले. नाम.केसरकर युतीच्या धर्माप्रमाणे नारायण राणे यांच्या प्रचारात सर्वार्थाने सामील झाले. परंतु, इथे प्रश्न उभा राहिला तो तळागाळातील कार्यकर्त्यांचा..!
राणे केसरकर यांच्या मधील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्या झळा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सोसल्या आहेत, कित्येक कार्यकर्त्यांचे घरातील व्यक्तींशी, गावातील लोकांशी संबंध टोकाचे बिघडले, मतभेद झालेत. *”प्रेमाने जग जिंकता येतं…शांतता तिथे सुबत्ता”* या टॅग लाईनवर दीपक केसरकर यांची लोकांशी नाळ जुळलेली आहे. परंतु ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पतपेढी आदी सर्वच निवडणुकांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांनी कडवा संघर्ष केला आहे..वैर पत्करले. आपल्या नेत्याचे गुण, व्हिजन जनतेपर्यंत पोचवून मतांचा जोगवा मागितला. कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही..विरोधकांना संपवून गावचा, जिल्ह्याचा विकास करायचा हे स्वतःच्या आणि जनतेच्या मनावर बिंबवले. परंतु….
अनेकदा संघर्ष करून विजयाचा गुलाल उधळणारे आणि पराभवाची सल मनात बाळगणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गावागावांतील कार्यकर्त्यांची, नेत्यांच्या समर्थकांची मने जुळणार कशी..?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदलेले राजकीय गणित पाहता वस्तुस्थिती हीच आहे की, नेते स्वतःच्या सोयीचे राजकारण करतात आणि कार्यकर्ते मात्र त्यात भरडले जातात.. राणे – केसरकर यांच्या संघर्षातून पोळून निघालेल्या कार्यकर्त्यांशी आजच्या राणे केसरकर दिलजमाई बाबत संवाद साधला असता… *”नेत्यांचे ठीक आहे, ते एकत्र आलेत परंतु, ज्यांच्याशी संघर्ष केला, ज्यांच्या विरोधात मते मागितली आज त्यांच्या साथीने आणि त्यांच्यासाठीच मते मागायला जाणे म्हणजे आमचे कार्यकर्त्यांचे जीवन लाजिरवाणे झाले आहे”* अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून ऐकू येऊ लागल्या आहेत.
आपला पक्ष आणि पक्षाचा नेता म्हणजेच सर्वस्व मानणारा कार्यकर्ता आज संभ्रमात आहे. कुठल्या तोंडाने जनतेसमोर जायचे..? हा प्रश्न आ-वासून कार्यकर्त्यांसमोर उभा आहे. महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येत निवडणुकांचे फॉर्म भरले गेले..प्रचाराचे नारळ फुटले..व्हील्स विला आलिशान गाडी मतदारसंघात दाखल झाली..परंतु जनतेची मते आपल्या नेत्याच्या पारड्यात फिरविणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय..???

प्रतिक्रिया व्यक्त करा