You are currently viewing स्मृति भाग ५९

स्मृति भाग ५९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५९*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

*दक्ष* स्मृतितील सहावा अध्याय पुन्हा शौचाचाराचा येतो . पण हा सूतकासंबंधी आहे . तो कसा ? ते पाहू .

 

*सूतकं तु प्रवक्ष्यामि जन्ममृत्युसमुद्भवम् ।*

*यावज्जीवं तृतीयन्तु यथावदनुपूर्वशः ॥*

आता मी जन्म व मृत्युपासून उत्पन्न सूतकास आणि तिसर्‍या जीवनभर चालणार्‍या सूतकास यथोचित वर्णन करतो .

ही अध्यायाची सुरवात आहे . यात *जीवनभर चालणारे सूतक* असा शब्दप्रयोग आलेला आहे . सावध होवूनच वाचावे . मी सर्वांस कळणार्‍या जन्म आणि मृत्यूचे सूतकाबद्दल काहीच बोलणार नाही . इथे आपण ज्यास *वृद्धि* म्हणतो , त्यास जन्म सूतक नावाने संबोधले गेले आहे , हे लक्षात ठेवावे .

 

*ग्रन्थार्थतः विजानाति वेदमङ्गैः समन्वितम् ।*

*सकल्पं सरहस्यञ्च क्रियावांश्चेन्न सूतकी ॥*

एखादा माणूस जर वेदाङ्गे , कल्प आणि रहस्य यांसह वेद पाठ व अर्थास जाणतो , तसेच त्यात सांगितलेल्या कर्मास करतो , तर तो सूतकीच होत नाही !!!!

खरं सांगू , प्रत्यक्ष परब्रह्माला कशाचे सूतक ?? पृथ्वी नष्ट होवो वा पुन्हा जन्म घेवो !!! तीच परिस्धिती उपर्युक्त जाणकाराची असेल तर कशाचे सूतक वा कशाची वृद्धि ? फक्त असा वर वर्णिलेला जाणकार रुक्षत्व ल्यालेला नसावा , एवढेच !!

हरि पंडित , संत एकनाथांचा मुलगा . त्याला नाथांनी सगळं ज्ञान दिलं . त्यानेही सगळे आनंदाने आत्मसात केलं . एक दिवस सामान्य जनांचे प्रश्न सोडवता सोडवता नाथांकडून सायं सन्ध्या राहिली ! हरि पंडिताने त्याबद्दल विचारले ! तेंव्हा नाथांनी सांगितले —

*मृता मोहमयी माता जाता बोधमयी सुता ।*

*सूतकद्वयसंपाते कथं सन्ध्या प्रवर्तते ॥*

माझी मोह नावाची माता आणि बोध नावाचा पुत्र मेलेला आहे . मला ही दोन सूतके असल्याने माझ्याकडून संध्या कशी घडेल ?

इतके सुंदर आणि विनोदी उत्तर देवसख्यत्वाशिवाय कसे सुचेल ? मी बारावी पास झालो . मला पुरंदरेंचे ” राजा शिवछत्रपति ” पुस्तक वडिलांनी वाचावयास दिले . त्यात वर्णन होते शिवाजी महाराजांचे पुण्यात लग्न झाल्यावर ते बेंगलोरला शहाजी महाराजांकडे नमस्काराला गेले . तिथे ” माझेसमोर लग्न झाले नाही म्हणून मी आता पुन्हा लग्न लावतो ” असे म्हणून दुसरे लग्न लावले शिवाजी महाराजांचे ! हे वाचल्यावर मी वडिलांना सहज विचारले , ” बापू , वडिल असावे तर असे , ज्यांनी आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावले ? ” तेंव्हा बापू दोन मिनिटे थांबून उद्गारले , ” बेटा , पुत्र असावा तर भीष्मासारखा ! ज्याने बापाचे दुसरे लग्न लावले !! ” आणि एकच हशा पिकला आम्हा बापबेट्यांचा !!! अशा विनोदांमुळे मला संवाद आणि विनोदाची उच्चतम पातळी कळाली यात शंका नाही ! विनोद हे क्रोधावरील एका मर्यादेपर्यंत औषध आहे , हे ही त्यावेळेस चर्चेतून माझे मनावर बिंबवले वडिलांनी !! असो.

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

 

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा