नव्या वर्षांत घर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी. नवीन वर्षात घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीचा भार बांधकाम व्यावसायिक उचलण्याची शक्यता आहे. कारण तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या विचाराधीन आहे. यावर मंत्रीमंडळाने निर्णय घेतला, तर नवीन वर्षात स्टॅम्प डय़ुटी फ्री घर खरेदी करता येईल.
तुमच्याऐवजी बिल्डर स्टॅम्प ड्युटी भरेल. त्यानंतर बिल्डरला डेव्हलपमेंट प्रीमियममध्ये ५० टक्के सूट मिळेल, असा हा प्रस्ताव आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार दोघांना फायदा होऊ शकतो. तसेच घर खरेदी वाढल्यास राज्याचं अर्थचक्र गतीमान व्हायला मदत होईल. दिलासादायक बाब म्हणजे स्टॅम्प ड्युटीत ३१ डिसेंबरपर्यंत कपात केल्यानं मुंबई, पुण्यात घर खरेदीची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्यामुळे त्याचा विचार करून सरकार ही नवी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
तसेच, मुद्रांक शुल्कात आता दोन टक्के सवलत मिळणार आहे. मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. ५० टक्के सवलत म्हणजे, ६ टक्क्यांऐवजी ३ टक्केच शुल्क आकारले जात होते. मात्र आता एक जानेवारीपासून तीनऐवजी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. ही दोन टक्क्यांची सवलत ३१ मार्चपर्यंत असणार आहे.