You are currently viewing पहाट

पहाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पहाट*

 

*रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल*

 

कुसुमाग्रजांच्या या एका ओळीतच पहाट या शब्दाचा खरा अर्थ दडला आहे. रात्रीचा अंधार संपतो आणि हळूहळू सूर्याची किरणे निळ्या आभाळाला रंगवत पसरत जातात. काल संपलाय, कालचा अंधार नाहीसा झालाय आणि आज पुन्हा पहाट झाली आहे. ही पहाट नवी आहे, नव्या स्वप्नांना, नव्या आशा आकांक्षांना घेऊन आली आहे.

पहाट म्हणजे नवा प्रहर, नवी भविष्यं, नवी उर्जा, नवी ध्येयं.पहाट म्हणजे निर्मितीचा काळ आणि “झालं गेलं विसरून जा आता पुन्हा नव्याने करू सुरुवात” असा संदेश घेऊन येणारा दिवसाचा एक महत्त्वाचा प्रहर.

 

कोंबडं आरवतं, तांबडं फुटतं, पक्षी घरट्यातून किलबिलत बाहेर पडतात, फांदीवर फुलं उमलतात, तळ्यात कमल दले उलगडतात,भ्रमराची मुक्ती होते, अंगणात प्राजक्ताचा सडा पडतो, सुवासिनी सुस्नात होऊन दारची तुळस पूजतात, सडा शिंपतात, रांगोळ्या रेखातात, देवळातली घंटा निनादते, मंत्रोच्चारांचा गजर होतो. सारं वातावरण कसं पवित्र, मंगलमय, प्रसन्न असतं! जणू सारं जळमट झडून जातं आणि पहाटेच्या या प्रहरी एका नव्या उर्जेने, नव्या क्षमतेने जीवन बहरू लागतं. उदया चली नित्य येणारा हा भास्कर जणू पहाटे काना कानात गुणगुणतो,

*घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला*

उठ आता आणि कामाला लाग.

 

विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यातील पहाट वेगळी असेल. कुठे धुक्यात लपेटलेली असेल, कुठे दवबिंदूत भिजलेली असेल, बर्फाचे कण पांघरून निवांत कुडकुडत असेल, कुणाच्या मिठीत असेल, शृंगाररंगात थकलेली असेल, कुठे धावत असेल, कुठे चालत असेल पण एक मात्र नक्की की साऱ्या झोपलेल्या चराचराला ती गती देत असते. जाग देते, जाण देते, शक्ती— बळ देते.

पहाट ही नेहमीच सकारात्मक असते, आशावादी असते. मरगळलेल्या मनाला उभारी देते, कर्तव्याची जाणीव करून देते. पहाटेच्या प्रहरात विश्वास असतो जे काल झालं नाही ते आज होईल अशी खात्री देतच पहाट उगवते म्हणूनच म्हटले जाते,” एक दिवस तुझ्याही आयुष्यात पहाट फुटेल”

किंवा “आज स्वातंत्र्याची पहाट उगवली…”

पहाटेत सौभाग्य दडलेलं असतं. या पहाटेत आश्वासकता असते, आवेश असतो, जोश असतो, प्रचंड ऊर्जा असते. मनावरच्या असंख्य बेड्या झुगारण्याची ताकद पहाटेत असते. पहाट मुक्त असते,स्वतंत्र असते. सत्य शिव सुंदराची ओढ लावणारी असते. पहाटेच्या प्रहरात शांत भक्ती रस असतो मन सहजच आध्यात्मिक बनतं. पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी अशी परमात्म्याची ओढ लागते. सुंदर विचारांचा झरा शरीर प्रवाहतून नकळत वाहतो.

 

अशी ही नीरव, निरामय, रस गंध नादयुक्त पहाट!

आयुष्याचे नवे गीत गातच उगवते…

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा