You are currently viewing लेखणी माझी धारदार

लेखणी माझी धारदार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*लेखणी माझी धारदार*

 

शाळेत असताना माझ्या काही आवडत्या कविता होत्या.

वा.भा. पाठक यांची,

*खबरदार जर याल पुढे चिंधड्या*

*उडविन राई राई एवढ्या*

किंवा

कुसुमाग्रजांची

*म्यानातून उसळे तलवारीची पात*

*वेडात मराठे वीर दौडले सात*

 

तसेच केशवसुतांची,

*एक तुतारी द्या मज आणुनी*

*फुंकीन मी जी स्वप्रणाने*

*भेदूनी टाकीन सगळी गगने..*

*दीर्घ जिच्या त्या किंकाळीने*

 

अशा आणि अशाच प्रकारच्या अनेक कविता. या कविता पाठांतराला असत आणि वर्गात सामूहिक रित्या म्हणताना आतून खूप काही प्रेरणादायी, स्फूर्तीदायी वाटायचं.

शिवाय त्यावेळी देशात युद्धाचेही वातावरण होते. चीन आणि पाकिस्तान बरोबरच्या त्या दोन लढायांनी कुमार वयात मनावर बराच परिणाम केलेला होता.

*माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू* किंवा,

*मुलख आपला गिळायला टपलाय बसलाय बगळा साधूवाणी*

हा दादा कोंडके लिखित पोवाडा आम्ही अगदी त्वेषाने गात असू.

विश्वास आणि आत्मबळ वाढवणारं हे लेखन असायचं.

हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की त्याच काळात आपणही काहीतरी लिहू शकतो असे जाणवू लागले होते आणि त्या वेळेच्या लेखन गुणांवर या साहित्याचा कळत नकळत संस्कार होत होता. मनापासून वाटायचं लिहावं तर असं धारदार, परिणामकारक, समाजशील, परिवर्तन करणार,प्रवर्तक. खरं म्हणजे वय होतं छुपंछुपं प्रेमकाव्य करण्याचं, तू माझा— मी तुझी अशा कथा लिहिण्याचं, किंवा मैत्रिणींच्या गळ्यात गळा घालून गुजगोष्टी लिहिण्याचं. उमलणारं, फुलणारं, संवेदनशील कधी रडवणारं कधी हसवणारं लिहिण्याचं. तसं खूप लिहिलंही.

एकेका वयाच्या टप्प्यावर लेखनाचे विषय, वातावरण,पात्रेही आपसूकच बदलत गेली. आयुष्यात येणाऱ्या एकेका अनुभवाने मन घडत गेलं तसं लेखनही प्रवर्तक होत गेलं.अधिक प्रौढ होत गेलं. पण त्यावेळी लिहून झाल्यावर असं वाटायचं आपलं लेखन एका चौकटीतलं आहे. ज्या समाजात आपण वावरतो, ज्या व्यक्ती आपल्या भोवती आहेत त्यातून दिसणाऱ्या जीवनाची टिपणं आपल्या लेखनात सहजपणे प्रतिबिंबित होतात पण हे आपल्या भोवतीच वर्तुळ मर्यादित आहे. या पलीकडे खूप मोठं जग आणि जीवन आहे तिथपर्यंत आपण पोहोचायला हवं, पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या लेखनात न अनुभवलेल्या पण जगात घडणाऱ्या अनेक घटनांचे धारदार पडसाद पडायला हवेत. ते अधिक समाजशील व्हायला हवे. आणि मग ती एक वैश्विक नजर वाचनातून, दृकश्राव्य माध्यमातून, सजगतेतून विचारातून, प्रश्नांतून, प्रत्यक्ष पाहून अथवा कानो कानी ऐकूनही मी मिळवण्याचा प्रयत्न केला.. प्रयत्न करत आहे. आणि माझ्या लेखणीला तसा सराव प्राप्त करून देत आहे.

*रात्र वैऱ्याची आहे जागा हो* असं काहीतरी आतून धक्के दिल्यासारखं जाणवतं आणि ही संवेदना माझ्या लेखनाला धार देते.

नव जग कसं असणार याचे स्वप्न स्वातंत्र्यापूर्वी पाहिलं गेलं आणि त्याच जाणीवेतून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा क्षेत्रात बदल घडवून आणणारं लिखाण झालं. कविता, पुस्तकं लिहिली गेली. रंगभूमीवर अशा विषयांची दमदार नाटकं सादर झाली. जी जनता खाली मान घालून जगत होती तिला स्वप्नं पाहायला शिकवली. त्या काळात *गणेश शंकर विद्यार्थीं* या सारख्या क्रांतिकारांनी *प्रताप* नावाच्या मासिकातून लोक जागृती केली होती. टिळकांनी, आगरकरांनी केसरीतून लोकांची मने सकारात्मक रित्या पेटवली होती. साने गुरुजींची *पत्री* पत्रकांनी गुलामगिरीवर आसूड मारले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी प्र. के. अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रांतून संपादकीय युद्धच जणू केले. कवी राजा बढेंनी,

*जय जय महाराष्ट्र माझा* ची धारदार घोषणा केली.

*संत तुकारामांनी म्हटलं आहे*,

*आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने* *शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू*

*शब्दचि आमच्या जीवाचे जीवन*

*शब्द वाटू जनलोका …*

 

आणि आज पुन्हा एकदा असाच उठाव करण्याची निकड निर्माण झाली आहे. वेगळ्या प्रकारची गुलामी आजही कायम आहे. भांडवलशाहीचा वरवंटा सामाजिक जीवनावर फिरतोय. बरं जीवन जगण्याकरता या पलीकडे जाऊन निडरपणे मानव मुक्तीचे जग निर्माण करण्यासाठी झोकून देण्याची वेळ आली आहे.

“भले ते देऊ कासेची लंगोटी

नाठाळांच्या माथी

हाणू काठी”

अशा कृतीची आज गरज आहे. राजकारण हा माझा विषय नाही पण ज्या समाजात मी राहते त्या समाजाविषयी मला तळमळ असणं स्वाभाविक आहे. म्हणूनच एक लेखिका म्हणून आणि त्यातूनही एक स्त्री लेखिका म्हणून मी कसं लिहायला हवं, काय लिहायला हवं याचा डोळसपणे, समंजसपणे विचार करू शकते. सभोवताली घडणाऱ्या स्त्री अत्याचारांच्या घटनांनी माझं मन कळवळतं.तरुणांच्या आत्महत्येने मी उदास होते.शेतकर्‍यांच्या आत्महत्या मला उद्विग्न करतात. संपत्तीची लालच,सत्तेचा लोभ, त्यान्वये होणार्‍या नीच स्पर्धा, यंत्रयुगामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास,कुटुंब संस्थेची मोडतोड,संपुष्टात आलेले संवाद मला त्रस्त करतात. माझ्या मनात एक जिवंत झरा आहे. मी कोरडी ठणठणीत, बथ्थड, आत्मकेंद्री, स्वमग्न राहूच शकत नाही. त्यामुळे माझी लेखणी धारदार आहे.कधी ती फुलासारखी कोमल असू शकते आणि तितकीच वज्रासारखी कठोरही बनू शकते. माझ्या लेखणीला सहस्त्र नेत्र आहेत. ती बाह्यरंग टिपते, अंतरंग टिपते. आणि पाकळ्या पाकळ्या उलगडून समर्थपणे सत्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा सकारात्मक प्रयत्न करते.ती निडर,स्पष्ट आणि पारदर्शी आहे. समाज बदलेल की नाही हे तिला माहित नाही. जे जे वाईट, नकोसे, अश्लील, बीभत्स, रौद्र तामसी समूळ नष्ट होईल किंवा नाही पण त्यावर प्रहार करणं हे माझ्या लेखणीचं कर्तव्य आहे आणि ती ते मनापासून, धार्मिकपणे, मुल्ये, नीती यांच्या चौकटी सांभाळून जाणीवपूर्वक करते. यश अपयश काळच ठरवेल पण पेर्ते व्हा, लिहिते व्हा हाच माझ्या लेखणीचा मानवीय धर्म आहे.

 

राधिका भांडारकर पुणे

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*Advt Link 👇*

——————————————

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

 

*हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)*

 

*~3000~/- फक्त 999/- मध्ये*

 

*दि. 21 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 वेळ : स. 10 ते सायं. 5.00 वा.*

*स्ट्रेस टेस्ट*

* दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

*शिरोधारा*

* मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा थेरपी अतिशय उपयुक्त आहे.

 

*माधवबाग मल्टी डिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स*

 

*नाव नोंदणी आवश्यक*

 

*कणकवली 9373183888 मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी*

 

*सावंतवाडी 7774028185*

*संचयनी पॅलेस, डॉ. जुवेकर जुना दवाखाना*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =