You are currently viewing होळी

होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*होळी*

 

होळी म्हणजे रंगाचा सण.एक रंगोत्सव..भारतात सर्वत्र

उत्साहाने साजरा होणारा लोकोत्सव..होळी सणाची अनेक नावे… होलिकादहन,शिमगा ,हुताशनी महोत्सव,

फाल्गुनोत्सव तसेच दुसर्‍याच दिवसापासून वसंत ऋतुचे आगमन होते म्हणून वसंतागमनोस्तव किंवा वसंतोत्सव!!

खरं म्हणजे या रंगोत्सवाशी लहानपणापासूनचं केवळ गमतीचं नातं.!! सुकलेला झाडाचा एखादा बुंधा खड्डा खणून रोवायचा.सुकी लाकडं,पेंढा ,पालापाचोळा गोळा करुन बांधायचा…आजुबाजुवाल्यांकडून वर्गणी गोळा करायची..होळी पेटवायची..ऊसळणार्‍या ज्वाला,तडतडणार्‍या ठिणग्या,कलशातून पाणी ओतत,

अग्नीला अर्पण केलेले नारळ अन् नैवेद्य..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मारलेल्या बोंबा…दुसर्‍या दिवशी धूळवड…ऊधळलेला गुलाल,रंगीत पाण्याच्या पिचकार्‍या,

होळीतून काढलेला भाजका नारळअन् होळीच्या धगीवर तापवलेल्या पाण्याने केलेली आंघोळ..या सामुहिक आनंदाचा मनसोक्त आनंद आम्ही लहान थोरांनी मिळून ऊपभोगला…मनात तेव्हा.नव्हता विचार पर्यावरणाचा..

तेव्हा नव्हते रासायनिक हानीकारक रंग…नव्हतं राजकारण,गुंडागर्दी लुटमार वर्गणीच्या नावाखाली…

एकमेकांवर रंग ऊडवण्याचा एक फक्त मैत्रीचा, स्नेहाचा

मनमोकळा मजेचा खेळ असायचा.. राधाकृष्णाच्या रासक्रीडेची प्रचलित गाणी निष्ठेनी गायली जायची…पण

कुठलाच फिल्मीपणा नव्हता….होता फक्त आनंद,गंमत सोहळा…..

पण आता मनात विचार येतात.का हे सण साजरे करायचे?.

काय महत्व यांचं?कसे साजरे करायला हवेत ,कसे नकोत..वगेरे वगैरे..पण आपल्या अनेक पारंपारिक

सणांमधे ,पूजनाबरोबर दहन ,ताडन, मर्दन,नादवर्धन

असते.दसर्‍याला रावण जाळतो,बलीप्रदेला काठी आपटत

ईड जावो पीड जावो..असे ऊच्चारण असते..चिराटं

चिरडून नरकासुराचे प्रतिकात्मक मर्दन असते…शंख घंटा ढोल ताशे सारखे नाद असतात..आणि एक पारंपारिक

काहीशी मनोरंजक,फँटसी असलेली ऊद्बोधक कहाणी असते.

फाल्गुन पौर्णीमेला साजरा केल्या जाण्यार्‍या होळी ला

होलिका दहन असते..हिरण्यकश्यपु नावाचा आसुर ,त्याची बहीण होलिका जिला अग्नी जाळू शकणार नाही याचे वरदान मिळालेले..आणि त्याचा विष्णुभक्तपुत्र प्रल्हाद.. विष्णुभक्तीचा अनादर असलेला हिरण्यकश्यपु प्रल्हादाचे भस्म करण्यासाठी ,त्याला होलिकेच्या स्वाधीन करतो.पण घडते निराळेच..अग्नी प्रल्हादाचे रक्षण करतो अन् होलीकेचेच दहन होते.

म्हणून होळी पौर्णिमेला आपण प्रतिकात्मक होलिकादहन

करतो..खरं म्हणजे हा सत्वाचा तामसावरचा विजय आहे!!या निमीत्ताने मनोविकार जाळून टाकायचे .भस्म करायचे..वाईटाची होळी आणि चांगल्याची पुनर्गुंफण….

बोंबा मारायच्या ..शिव्याही द्यायच्या..का? हे असभ्य असंस्कृत अमान्य तरीही…??यामधे मनोविश्लेषणाचे कारण आहे…मनांत खूप कोंडलेलं असतं..प्रतिष्ठेच्या नावाखाली…समाजाच्या भीतीने. हे जे काही कुलुपात बंद असते ,त्याला या माध्यमाने मुक्त करायचे..तशी या दिवशी परवानगी असते…थोडक्यात ही एक थेरेपी आहे…मनातले ओंगळ बाहेर काढण्यासाठी.

शिवाय निसर्ग तर प्रत्येक सणाच्या केंद्रस्थानी असतोच.

शिशीर ऋतुची शुश्कता संपून वसंताचे आगमन होणार आहे…जुनं गळून नवं अंकुरणार…यौवन फुलणार..सृष्टीच्या प्रणयाचे रसरंग फवारणार..म्हणून हा रंगोत्सव…वसंतोत्सव…

करुया साजरा…

या हर्षोत्सवात सामील होवूया…

सुकलेली शुष्क चेतना नसलेली काष्ठे वापरु..त्यासाठी वृक्षतोड नको…रासायनिक रंग नाही ऊडवायचे…

बोंबा मारु शिव्या देऊ पण केवळ गंमत…कुठलाही हिंसक प्रकार नसेल….आणि कुणा गलगले मास्तरांनी

नाहीच दिली वर्गणी तरीही त्यांना होळीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद मात्र नक्की देऊ..

 

*राधिका भांडारकर*

*पुणे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा