You are currently viewing रसेलच्या झंझावातापुढे हैद्राबाद हतबल

रसेलच्या झंझावातापुढे हैद्राबाद हतबल

*हर्षितमुळे कोलकाताचा विजय सुकर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

आयपीएल २०२४ च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चार धावांनी विजय मिळवला. शनिवारी झालेल्या सामन्यात संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकांत ९ गडी गमावून २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पॅट कमिन्सच्या संघाला २० षटकांत सात गडी गमावून २०४ धावा करता आल्या. कोलकाताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. आता संघाचा सामना २९ मार्चला बेंगळुरूमध्ये आरसीबीशी होणार आहे.

 

२०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची दमदार सुरुवात झाली. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी झाली. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षित राणाने अग्रवालला झेलबाद केले. त्याने २१ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ धावा काढल्या. तर अभिषेक शर्मा ३२ धावा करू शकला. रसेलने त्याला आपला बळी बनवले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी झाली. मार्कराम १८ धावा करून तंबूमध्ये परतला. तर राहुलला २० धावा करता आल्या.

 

१५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १२८ धावा होती. त्यावेळी क्लासेन १८ धावा तर अब्दुल समद दोन धावा करून खेळत होते. १७व्या षटकात चौकार मारण्याच्या प्रयत्नात समदने आपली विकेट गमावली. त्याला १५ धावा करता आल्या. १७ षटकांनंतर धावसंख्या पाच विकेटवर १४९ धावा होती. त्यानंतर शाहबाज अहमद फलंदाजीला आला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात ६० धावांची गरज होती. क्लासेन-शहबाजने १८व्या षटकात गियर बदलला आणि या षटकात २१ धावा केल्या. हे षटक वरुण चक्रवर्तीने केले. यानंतर १९व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला आणि त्याच्या षटकात क्लासेन-शहबाजने २६ धावा केल्या. क्लासेननेही आपले अर्धशतक २५ चेंडूत पूर्ण केले. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती आणि २२ वर्षीय हर्षित राणा गोलंदाजीसाठी आला. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर क्लासेनने एकेरी धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर हर्षितने शाहबाजला (१६) श्रेयस अय्यरकडे झेल देण्यास भाग पाडले. नवीन फलंदाज यानसेनने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर हर्षितने क्लासेनला सुयशकरवी झेलबाद केले. क्लासेनने २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती आणि कमिन्स स्ट्राइकवर होता. मात्र, स्लोअर वनवर कमिन्सचा फटका चुकला आणि कोलकाताने चार धावांनी विजय मिळवला.

 

सामन्यात हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने २१७.२४ च्या स्ट्राईक रेटने आठ षटकार ठोकले. मात्र, तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संघाला विजयासाठी पाच धावांची गरज होती, मात्र हर्षित राणाने त्याला सुयश शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्स फलंदाजीला आला आणि खातेही न उघडता नाबाद राहिला. मार्को जॅन्सनही एक धाव घेत नाबाद राहिला. सामन्यात हर्षित राणाने तीन तर आंद्रे रसेलने दोन बळी घेतले. त्याचवेळी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

 

नाणेफेक गमावल्यानंतर केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात गडी गमावून २०८ धावा केल्या. फिलिप सॉल्ट, रमणदीप सिंग, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी संघाला हे लक्ष्य गाठण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या चार फलंदाजांशिवाय केकेआरचा कोणताही खेळाडू जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. संघाला पहिला धक्का सुनील नरेनच्या रूपाने बसला जो केवळ दोन धावा करू शकला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरलाही विशेष काही करता आले नाही. तो टी. नटराजनकरवी जॉन्सनच्या हाती झेलबाद झाला. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो सात धावा काढून तंबूमध्ये परतला. तामिळनाडूच्या या गोलंदाजाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपाने या षटकात आणखी एक विकेट घेतली. २९ वर्षीय फलंदाज चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. ३२ धावांवर संघाने तीन विकेट गमावल्या. हा क्रम इथेच थांबला नाही, केकेआरला चौथा धक्का मयंक मार्कंडेयने नितीश राणाच्या रूपाने दिला जो केवळ नऊ धावा करू शकला. कोलकाताने ५१ धावांच्या नाममात्र धावसंख्येवर चार विकेट गमावल्या होत्या. संघाला चांगल्या भागीदारीची गरज होती. अशा स्थितीत फिलिप सॉल्ट आणि रमणदीप सिंग यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी पॅट कमिन्सने भेदली. त्याने १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रमणदीपला मार्कंडेयकरवी झेलबाद केले. २६ वर्षीय फलंदाजाने ३५ धावा केल्या तर फिल सॉल्टने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

 

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने शेवटच्या पाच षटकांत एक विकेट गमावून ८५ धावा केल्या. रसेल आणि रिंकू सिंग यांच्यात सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली. वेस्ट इंडिजच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने २५ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली. या नाबाद खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि सात षटकार आले. तर रिंकू सिंगने तीन चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. टी. नटराजनने त्याला आपला बळी बनवले. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला स्टार्क सहा धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात टी. नटराजनने तीन तर मयंक मार्केंडेने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी पॅट कमिन्सनेही एक विकेट घेतली. आंद्रे रसेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा