You are currently viewing खारेपाटण चेकपोस्टवर २८ लाखाच्या दारू सह ट्रक जप्त…

खारेपाटण चेकपोस्टवर २८ लाखाच्या दारू सह ट्रक जप्त…

खारेपाटण चेकपोस्टवर २८ लाखाच्या दारू सह ट्रक जप्त…

कणकवली

पोलीस – एक्साईज पथकाची संयुक्त कारवाई…
कणकवली, ता.१८ : तालुक्यातील खारेपाटण चेकपोस्टवर २८ लाख ८८ हजार रुपयांची गोवा बनावटीच्या दारू सह ३५ लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस,एस.एस.टी पथक आणि एक्साईज कणकवली च्या पथकाने पकडला आहे.

या गुन्ह्यात टेम्पो चालक मालक दिनेश रमेश व्यास ( वय ३९, रा. अहमदाबाद गुजरात, सध्या रा. वसई ) याला अटक करण्यात आली आहे.खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांच्या सतर्कतेमुळे ही अवैध दारू पकडण्यात यश आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल , अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या सूचनेनुसार पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे आज १८ मार्च रोजी सकाळी ६ : ३० वाजता गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो क्र. MH -48 – BM -9691 ची पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी तपासणी केली. टेम्पोच्या हौद्यात दारुसाठा आढळताच साबळे यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले. चेकपोस्टवरील एसएसटी टीम मधील आर एल शिंदे, बापू कुचेकर यांनी एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांना कळविले. त्यांनतर कणकवली पोलीस तसेच एक्साईज च्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ४०० रुपयांच्या अवैध दारुसह ३५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संयुक्त कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते, एस एस टी प्रमुख आर एल शिंदे, बापू कुचेकर ,एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे, महिला पोलीस जवान एस एस कुवेस्कर यांच्या पथकाने केली. अधिक तपास एक्साईज कणकवली चे निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा