You are currently viewing बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगाराचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या‌ हस्ते वाटप !

बंद एनटीसी गिरणी कामगारांच्या थकीत पगाराचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या‌ हस्ते वाटप !

*गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्बांधणीची सचिन अहिर यांची मागणी!*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

मुंबईतील बंद गिरण्या, प्रत्येक युनिट निहाय आर्थिक सक्षमता पाहून लवकरच पूर्ववत चालू केल्या जातील, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या प्रस्तावाचा उल्लेख करून मंत्रीमहोदय असेही म्हणले की, एनटीसी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्नाही लवकरच निकालात काढला जाईल!

मुंबईसह देशभरात एनटीसीच्या बंद २३ गिरण्यांमधील कोविड काळातील उर्वरित ५० टक्के पगार आणि इतर थकबाकीच्या धनादेशाचे वाटप आज सह्याद्री अतिथी गृहात पार पडले. त्या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, आमदार काळीदास कोळंबकर, रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्यासोबत दिल्ली एनटीसी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा उपस्थित होत्या. मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील बंद २३ एनटीसी गिरण्यांतील कामगार उपस्थित होते. कोविड काळात कामगारांनी सहकार्य केलेल्या कामाची मंत्री महोदयांनी प्रशंसा केली.

सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात देशभरातील एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेण्यात आली होती, या गोष्टीची आठवण करून देऊन सांगितले की, या गिरण्या गेली चार वर्षे बंद असून, कामगारांना न्यायालयाच्या मार्गाने ५० टक्के पगार मिळवून दिला.

एनटीसी गिरण्यांच्या जमिनी विकून आलेल्या टिडिआरची रक्कम गिरण्या पूर्ववत चालू करण्यासाठी वापरावी, असा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता, असे‌ सांगून सचिन अहिर म्हणाले, मुंबईतील ५० वर्षापेक्षा अधिक काळ धोकादायक एनटीसी गिरण्यांच्या चाळींची पुनर्बांधणी त्वरित व्हावी, अशीही सचिन अहिर यांनी मागणी केली. आमदार कालिदास कोळंबकर यांनीही गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उचलून धरला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एनटीसी‌ गिरण्या पुर्ववत चालविण्याच्या घोषणेचे स्वागत केले. कार्यक्रमाला खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा