मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी करंडक विजेतेपदाचा सामना रंगला. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत आटोपला. तर सामन्याच्या दुसऱ्या डावात मुंबईने ४१८ धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी ५३७ धावांची झाली आणि विदर्भासमोर ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात ३६८ धावांत सर्वबाद झाला. यासह मुंबईने हा सामना १६९ धावांनी जिंकत रणजीमध्ये ४२वे विजेतेपद पटकावले.
अथर्व तायडे आणि ध्रुव शौरे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ६४ धावांची भागीदारी केली. मात्र, याच धावसंख्येवर विदर्भाने दोन्ही विकेट गमावल्या. अथर्व ३२ धावा करून बाद झाला तर ध्रुव २८ धावा करून बाद झाला. यानंतर अमन मोखाडे आणि करुण नायर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी झाली जी मुशीर खानने भेदली. अमन ७८ चेंडूत ३२ धावा करू शकला. संघाला चौथा धक्का यश राठोडच्या रूपाने बसला तो केवळ सात धावा करू शकला.
करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या दिवशी फलंदाजीला सुरुवात केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १७३ चेंडूत ९० धावांची भागीदारी केली. नायर ७४ धावांची दमदार खेळी खेळून बाद झाला तर अक्षय १०२ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याला तनुष कोटियनने बाद केले. अक्षर आणि हर्ष दुबे यांच्यात सहाव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी झाली. हर्षला दुसऱ्या डावात ६५ धावा करता आल्या. यानंतर विदर्भाचा डाव गडगडला. मुंबईविरुद्ध आदित्य सरवटेने तीन, यश ठाकूरने सहा, उमेश यादवने सहा धावा केल्या. तर आदित्य ठाकरे एकही धाव न काढता नाबाद राहिला.
मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मुंबईच्या दुसर्या डावात पृथ्वी शॉ ११ धावा, भूपेन लालवाणी १८ धावा, अजिंक्य रहाणे ७३ धावा, श्रेयस अय्यर ९५ धावा, हार्दिक तामोर ५ धावा, मुशीर खान १३६ धावा, शार्दुल ठाकूर शून्य, तनुष कोटियन १३ धावा करून बाद झाले. यानंतर अखेर शम्स मुलाणीने नाबाद ५० धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने १३, तुषार देशपांडेने २ धावा केल्या.
विदर्भाच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला तंबूमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला तंबूमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. आज विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला तंबूमध्ये पाठवले. अथर्वला २३ धावा करता आल्या.
यानंतर शम्स मुलाणी याचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना तंबूमध्ये पाठवले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (२७), यश ठाकूर (१६) आणि उमेश यादव (२) यांना तंबूमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.
मुंबईच्या पहिल्या डावाची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी भेदली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला ३७ धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला त्रिफळाचीत केले. त्याला ४६ धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. शम्स मुलाणी १३ धावा करून बाद झाला.
टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेले रहाणे आणि श्रेयस पहिल्या डावात फ्लॉप ठरले. हे दोघेही तामिळनाडूविरुद्धच्या रणजी उपांत्य फेरीत फ्लॉप ठरले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा फलंदाजीतून चमत्कार दाखवत ६९ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. तनुष कोटियन आठ धावा करून बाद झाला तर तुषार देशपांडे १४ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुंबईचा डाव २२४ धावांवर आटोपला. विदर्भाकडून हर्ष दुबे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर उमेश यादवने दोन गडी बाद केले. आदित्य ठाकरेने एक विकेट घेतली.
मुशीर खानला सामनावीर तर तनुष कोटियनला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.