You are currently viewing मौन..

मौन..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल गीते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

मौन..

 

लपवुनी डोळ्यात अश्रू, वेदना मी सोसल्या

मौन झाले मग.. व्यथा का काळजाशी बोलल्या

 

वेढली मी बंधने, नात्यात खोट्या गुंतले

बंधनांनी वेढलेल्या शृंखला मी तोडल्या

 

जीवनांती सोबतीला जीव पणती जाळते

वात विझता, जन्मल्याच्या भाग्यरेषा खोडल्या

 

मी पणाला.. स्त्रीत्व माझे जीवनी या लावले

भोगले मनस्ताप अन् शिक्षा किती मी भोगल्या

 

कुंकवाचा मान जाता निर्दयी झाल्या प्रथा

ओढले मग जोडवे अन बांगड्याही फोडल्या

 

भेटले डोळ्यास डोळे प्रेम नाते जोडले

काळजाशी काळजाच्या भावना मी जोडल्या

 

तारकांना मोजताना चंद्र थकुनी झोपला

जागल्या देहात साऱ्या चांदण्या मी ओढल्या

 

मोजला पैसा किती अन् धन किती तू ओढले

शेवटी देहातल्या अस्थी कुणी मग मोजल्या

 

सोडले घरदार सारे सर्व आशा सोडल्या

मोडला संसार आणिक सर्व वाटा मोडल्या

 

मृणाल गिते

प्रतिक्रिया व्यक्त करा