You are currently viewing टीम इंडियाने ५२ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या, भारताकडे २५५ धावांची आघाडी

टीम इंडियाने ५२ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या, भारताकडे २५५ धावांची आघाडी

*टीम इंडियाने ५२ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या, भारताकडे २५५ धावांची आघाडी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात आठ गडी गमावून ४७३ धावा केल्या होत्या. सध्या कुलदीप यादव २७ धावांवर आणि जसप्रीत बुमराह १९ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्या डावात २१८ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत टीम इंडियाची आघाडी २५५ धावांवर पोहोचली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी ही आघाडी आणखी वाढवायची आहे.

शुक्रवारी पहिल्या सत्रात भारताने ३० षटकात १२९ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. या मालिकेतील ही पहिलीच वेळ होती की एखाद्या संघाने १०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. यानंतर दुसऱ्या सत्रात (दुपारच्या जेवणापासून चहापर्यंत) भारताने २४ षटकात ४.६७ धावगतीने ११२ धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या. चहापानानंतर तिसऱ्या सत्रात भारताने ३६ षटकांत ९७ धावा केल्या आणि पाच विकेट गमावल्या.

गुरुवारी यशस्वी जैस्वाल ५७ धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका विकेटवर १३५ धावांवर केली आणि दिवसभर खेळल्यानंतर ३३८ धावा जोडल्या आणि सात विकेट गमावल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी करत भारताला २५० च्या पुढे नेले. रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १८वे शतक झळकावले आणि शुभमनने चौथे शतक झळकावले. या मालिकेतील दोघांचे हे दुसरे शतक ठरले. ही भागीदारी बेन स्टोक्सने भेदली. नऊ महिन्यांनंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्टोक्सने या मालिकेत प्रथमच गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर रोहितच्या यष्टी उध्वस्त केल्या. रोहितने १६२ चेंडूत १३ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. डावाच्या ६२ व्या षटकात आणि पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने शुभमन गिलला त्रिफळाचीत बाद केले. गिलला १५० चेंडूत १२ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ११० धावा करता आल्या.

यानंतर सरफराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. चहाच्या वेळेनंतर बशीरचा कहर दिसला. त्याने सर्फराजला चालायला लावले. एकेकाळी भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ३७६ धावा होती आणि पुढील ५२ धावा करताना संघाने पाच विकेट गमावल्या. धावसंख्या तीन बाद ३७६ वरून एका क्षणी ८ बाद ४२८ वर गेला. सर्फराज बाद झाल्यानंतर पडिक्कलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलही १५ धाबंवर बाद झाला. शोएब बशीरने तिघांनाही तंबूमध्ये पाठवले. त्याचवेळी टॉम हार्टलेने रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला बाद केले. जडेजा १५ धावा करून बाद झाला आणि अश्विन खातेही न उघडता बाद झाला. ५२ धावांत पाच गडी गमावल्यानंतर कुलदीप आणि बुमराहने ४५ धावांची नाबाद भागीदारी केली आणि २५० च्या पुढे आघाडी घेतली.

तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने १००वी कसोटी खेळत चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व १० विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. डकेट २७ धावा करू शकला. क्रॉलीने १०८ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा केल्या. जो रूट २६ धावा करून बाद झाला, तर १००वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो २९ धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या १७५ धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या ५० व्या षटकात हार्टली (६) आणि वूड (०) यांना तंबूमध्ये पाठवले. बशीर ११ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडचा डाव २१८ धावांवर आटोपला.

प्रतिक्रिया व्यक्त करा