You are currently viewing स्वतःशी संवाद साधत असताना कविता जन्माला येते – शर्मिला महाजन

स्वतःशी संवाद साधत असताना कविता जन्माला येते – शर्मिला महाजन

शिवतेजनगर, चिंचवड – (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

स्वतःशी संवाद साधत असताना कविता जन्माला येते,असे प्रतिपादन कवयित्री, लेखिका शर्मिला महाजन यांनी केले. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ मंदिर, पारायण हॉल, शिवतेजनगर, चिंचवड येथे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या कवीसंमेलनात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, एखादी कविता सहज सुचते, तर एखाद्या कवितेवर बरीच प्रक्रिया करावी लागते. अर्धवट राहिलेल्या कवितेवर सोपस्कार केले पाहिजेत. कविता जन्माला आल्यानंतरचा आनंद काही वेगळाच असतो.

माजी नगरसेवक नारायण बहिरवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवेदक,व्याख्याते राजेंद्र घावटे, संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे, उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कार्याध्यक्ष दिनेश भोसले हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मा.नारायण बहिरवडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर दिसून येते की, महिला कर्तृत्वान, कर्तबगार आहेत. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सिंधुताई सपकाळ, मदर टेरेसा अशा कितीतरी महिलांनी आपल्या देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे. राजकारणात देखील महिला आघाडीवर आहेत. आज सर्व क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे.”

संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “आज महिला दिन साजरा करत असताना, त्याचा इतिहास विसरता कामा नये. कष्टकरी आणि कामगार महिलांनी, स्वतःच्या हक्कासाठी लढा दिला, युरोपमध्ये महिलांनी मतदानाच्या हक्कासाठी लढा दिला आणि हा लढा काही प्रमाणात यशस्वी झाला म्हणून आज महिला दिन साजरा करीत आहोत. पण अजूनही महिलांचे प्रश्न संपलेले नाहीत. महिला दिन हा उत्सव आणि सण म्हणून साजरा न करता, त्या पाठीमागचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे.”

यावेळी कवी संमेलनात मा. शोभाताई जोशी यांनी, “आभाळ समदं भरून आलंय बाहेर नको तू जाऊस, येऊ द्या ना धो धो पाऊस, धनी मला पावसात भिजायची हाऊस.”

सुप्रिया लिमये यांनी, “बरेच दिवसात नाही फिरले पाठीवरूनी आई बाबांच्या हाताचे मोरपीस, आठवण तर त्यांची नित्य येते, तळमळतो जीव होतो कासावीस.”

सीमा गांधी यांनी, “खोल जाणिवांचे बिलोरी साज अंगभर लेवून, ती जपत असते निर्व्याज सुखाची सावली देणारे हिरवं झाड.”

माधुरी डिसोजा यांनी, “तू घेतला वसा अर्थाचा मी आरोग्याचा, अर्थात आधी आरोग्य सांभाळ मनाची तारेवरची कसरत”.

जयश्री श्रीखंडे यांनी, “माझ्या माहेरा अंगणी सडा शिंपतो प्राजक्त, स्वर्गमयी सुवासाने जागवतो आसमंत.”

नेहा चौधरी यांनी, “मनाला असते वास्तवाची जाण, मन म्हणजे असतं स्वप्नांची खाण.”

फुलवती जगताप यांनी, “अहो काय सांगू तुम्हाला गंमतच झाली चक्क.”

चिऊताई माझ्या स्वप्नात आली. अशा विविध आशियाच्या कविता कवयित्रींनी सादर केल्या. त्याचबरोबर, राधाबाई वाघमारे, शामला पंडित, योगिता पाखले, सुमन दुबे, योगिता कोठेकर, मृणाल जैन, संगीता वेताळ, रेणुका हजारे, वंदना इन्नानी, अस्मिता चांदणे, आश्विनी जगताप, क्षमा काळे, रेखा कुलकर्णी, कांचन नेवे, रेवती साळुंखे, सुधा पाटील, आणि इतर अशा 25 कवयित्रीने कवी संमेलनात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या संयोजनात श्री मुकेश चौधरी, फुलवती जगताप, दिनेश भोसले, राजू गुणवंत, श्री. कचरे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बालगोपाल यांनी केले व आभारप्रदर्शन नंदकुमार मुरडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा