You are currently viewing जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका अनघा अनिल कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने —*

 

8 मार्च जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा किंवा सत्कार करण्याचा दिवस. महिला देखील देशाच्या प्रगतीचा आधार आहेत अशी जाणीव ठेवणे. महिलांची कामगिरी मग ती सामाजिक असो आर्थिक सांस्कृतिक किंवा राजकीय असो अशा महिला सामर्थ्याचा गुण्यागोविंदाने सन्मान करण्याचा दिवस.

काही ठिकाणी सुट्टी असते म्हणून महिला दिन हा सिनेमा पार्टी किंवा आउटिंग करून साजरा करतात. महिला देखील एकमेकींना शुभेच्छा देतात परंतु ज्यांच्यामुळे हा दिवस साजरा करण्याचे भाग्य लाभले त्यांचे स्मरण झाले पाहिजे, त्यांच्या स्मृती त्या दिवशी उजळल्या गेल्या पाहिजेत.

या दिनाला आता जवळजवळ एकशे दहा वर्षांचा इतिहास आहे.देश कोणताही असो, विसाव्या शतकापर्यंत महिलांना मतदानाचा हक्क अमेरिका, युरोपमध्ये सुद्धा नव्हता.१९०८ साली सुमारे पंधरा हजार महिलांनी न्युयॉर्क येथे आपल्या अधिकारांसाठी मोर्चा काढला. त्या हक्कासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या प्रमुख तीन मागण्या होत्या पहिली म्हणजे वेतन वाढवणे,दुसरी कामाचे तास कमी करणे आणि तिसरी अर्थात मतदानाचा हक्क किंवा अधिकार मिळावा. या संघर्षात जर्मन महिला क्लारा झेट किन ही लढाई झुंजार अशी प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची महिला होती.क्लारा ने १७ देशांच्या १०० प्रतिनिधींसमोर राष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव ठेवला होता.नंतर ऑफिशियली १९७५ मधे युनोने सांगितले की एक दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस पाळला जावा.१९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय वुमेन्स इअर म्हणून पण जाहीर करण्यात आले.१९९६ पासून दरवर्षी एक थीम पण पाळण्यात येते.यूनोने असेही सांगितले की महिला दिनाचे तीन रंग मानले जावेत. पहिला म्हणजे जांभळा जो न्याय व प्रतिष्ठेचा आहे दुसरा हिरवा जो आशेचा आहे आणि तिसरा पांढरा जो पावित्र्याचा मानला जातो. स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा जागतिक महिला दिन साजरा होतो.

रशियन महिलांना ८ मार्च रोजी मताधिकार मिळाले म्हणून हा दिवस आठ मार्चला साजरा करतात. हा लढा यशस्वी झाल्यावर १९०९ मध्ये २८ फेब्रुवारीला न्युयॉर्क मध्ये महिला दिन साजरा झाला. भारतात ८ मार्च १९४३ रोजी प्रथम मुंबईत साजरा केला गेला.

आपल्या देशात सुद्धा सामर्थ्य व ताकदवान महिलांची उदाहरणे आहेत. राजकारणात इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, सामाजिक क्षेत्रात मेधा पाटकर, पोलीस क्षेत्रात तिहार जेलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किरण बेदी तर इतिहासात जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, आनंदी जोशी, सावित्रीबाई फुले शिवाय लेखिका, कवयित्री, शिक्षण क्षेत्रात व प्रशासकीय सेवेत सुध्दा महिला उच्च पदावर आहेत. जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांना विसरून चालणार नाही. इतक्या सर्व प्रभावशाली महिलांकडून इतर महिलांना नेहमीच प्रेरणा मिळते.

हे सर्व जरी प्रेरणादायी असले तरी आजही महिला हव्या तेवढ्या सुरक्षित नाहीत. त्यांचे शोषण, विनयभंग या सर्व लाजिरवाण्या बाबी घडत असतात. त्यांना प्रवासात सुरक्षित वाटते का? महिलांसाठी अनेक कायदे, सवलती आहेत पण त्यांची पोच मात्र सर्व महिलांजवळ नाही. संपूर्ण समाजाने महिलांबाबत आपला दृष्टिकोन बदलावा. त्यांना आदराने वागवावे तरच महिला खऱ्या अर्थाने सुखी होतील.

प्रत्येकाला जन्म देणारी, नात्यांचे सुंदर गुंफण करणारी, प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहणारी, त्याग, नम्रता व श्रद्धेचे प्रतिक असलेली, प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारी अशी ही नारी आदिशक्तीचे रूपच नव्हे का?

 

सौ. अनघा अनिल कुळकर्णी🙏

पुणे. ९३२३४९१११३

प्रतिक्रिया व्यक्त करा