जानेवारीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने पक्ष संघटना वाढीसाठी कमालीची आघाडी घेतली आहे. शिवसेना भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रवाहात आणून धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. पायाला भिंगरी लावल्यागत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी असल्याने, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या प्रवाहात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा एक गट कमालीचा नाराज आहे. पक्षांतर्गत कार्यक्रमाला याला नको त्याला बोलवा अशा सूचना केल्या जात असल्याने जिल्हा राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावून उदय भोसले यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला.माजी राज्यमंत्री दीपक केसरकर राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर खिळखिळी झालेल्या जिल्ह्यातील राष्ट्रपतीला माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी उभारी दिली.सुरेश गवस यांनी सक्रिय केलेले ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या प्रवाहात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.