You are currently viewing आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटी विभाग सज्ज

आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटी विभाग सज्ज

जिल्ह्याच्या विविध आगारातून १६७ बस सोडण्यात येणार

 

मालवण :

 

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. एसटीच्या १६७ बस जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून सोडण्यात येणार आहेत. तर सर्व बसस्थानकात पुरेसे प्रवासी उपलब्ध झाल्यानंतर दिवसरात्र बसेस आंगणेवाडीसाठी रवाना होणार आहेत.

उद्या २ मार्च रोजी भराडी देवीची यात्रा होत आहे. त्यासाठी आज दुपारपासूनच बसेस सोडल्या जात असल्याची माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली. तर प्रवाशांचे भारमान पाहून कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आदी रेल्वे स्टेशन पासून तेथील एसटी आगारापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

कुडाळ बसस्थानक ते आंगणेवाडी मंदिर या मार्गावर ४३ गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या कुडाळ ते कसाल तेथून हिवाळेमार्गे आंगणेवाडी अशा धावणार आहेत. त्याचबरोबर कसाल, खोटले ते आंगणेवाडी, कुडाळ ते निरूखे तेथून पांग्रड ते आंगणेवाडी तसेच कुडाळ ते पणदूर ते ओरोस ते आंगणेवाडी अशा मार्गावर बसेस धावणार आहेत, अशी माहिती एस.टी. विभागाने दिली आहे.

तसेच मालवण बस आगार ते आंगणेवाडी पर्यंतच्या प्रवासासाठी ६४ बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी, मसुरे ते आंगणेवाडी चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी, देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी, वराड ते आंगणेवाडी, तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी, कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी, धामापूर ते आंगणेवाडी या मार्गावर बसेस धावणार आहेत.

आंगणेवाडी साठी कणकवली आगारातून ३१ बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी अशा धावणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी मार्गावर २२ बसेस धावणार आहेत. देवगड आचरा ते आंगणेवाडी, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी, तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी, कुडोपी ते आंगणेवाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी, आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी अशा बसेस धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. एसटीच्या या सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा