You are currently viewing ‘येळकोट येळकोट जय मल्हार’..

‘येळकोट येळकोट जय मल्हार’..

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर, भंडार-खोबऱ्याचाच्या उधळण आणि सनई-चौघड्याच्या निनादात काल (दि. २०) रोजी अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला. खंडोबा देवाला वांग्याचे भरीत, पाच धान्यांच्या पिठाचा रोडगा, कांद्याची पात, पुरण पोळीचा नैवद्य दाखवून चंपाषष्ठी उपासनेची सांगता केली.

१५ ते २० डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक खंडोबा गडामधील नवरात्र महालामध्ये खंडोबाचे घट बसवण्यात आले होते. या सहा दिवसांच्या काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने गड उजळला होता. तर मुख्य मंदिर व देवाचा गाभारा पुष्ठलांनी सजविण्यात आला होता. भल्या पहाटे स्थानिक मानकरी-ग्रामस्थांच्या पूजा व अभिषेक झाले. त्यानंतर देवाचे घट उठवण्यात आले. हजारो भाविकांनी आज गडावर देवाचे दर्शन घेतले. शनिवारी (दि. १९) रात्री जेजुरी गावातून प्रथेप्रमाणे तेल हंड्याची मिरवणूक काढण्यात आली. सनई-ढोल वाजवीत हा तेल हंडा खंडोबा गडावर नेण्यात आला. रात्री देवाला या तेलाचे तेलवण करुन हळद लावण्यात आली.

पाली (जि. सातारा) येथे पौष र्पोणिमेला खंडोबा-म्हाळसादेवीचा विवाह केला जातो. या लग्नाची हळद जेजुरी गडावर खंडोबाला लावली जाते. यानिमित्त गडावर फराळाचा रुखवतही मांडण्यात आला होता. चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी खंडोबाला श्रद्धापूर्वक वांग्याचे भरीत, रोडगा, पुरणपोळी, कांद्याची पात आदी नैवेद्य अर्पण केले. साऱ्या महाराष्ट्रात आज घराघरात बसविलेले खंडोबाचे घट उठवण्यात आले. तळी-आरती करुन देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांना तोंडाला मास्क लावणे, गर्दी न करणे अशा सूचना वारंवार खंडोबा देवस्थानच्या वतीने दिल्या जात होत्या. परंतु अनेक भाविक याकडे दुर्लक्ष करीत होते. भंडार-खोबरे मोठ्या प्रमाणात खरेदी करुन खंडोबाला अर्पण केले. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने दररोज भाविकांना भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + fourteen =