You are currently viewing शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

*शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

पिंपरी

महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखा, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा शैक्षणिक संकुल – चिंचवड यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या एकदिवसीय शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाला विद्यार्थी, अध्यापक, प्राध्यापक, साहित्यिक आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, काळभोरनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या अध्यक्षतेखाली एकूण आठ सत्रांमध्ये संमेलन संपन्न झाले. उद्घाटन सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य
प्रा. रवींद्र बेडकिहाळ, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. विलास सिंदगीकर, दिनेश औटी यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ आणि कार्यकारिणी सदस्य तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना संगणक साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेषज्ञ चर्चा सत्रात आय. टी. सी. भारती विद्यापीठाचे डॉ. सचिन कदम आणि माहिती व तंत्रज्ञान विशेषज्ञ अतुल कहाते यांनी डॉ. दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य व मूल्यमापन’ या विषयावर ऊहापोह केला. श्रोत्यांनी या विषयासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी खुसखुशीत शैलीत परंतु अभ्यासपूर्ण उत्तरे दिलीत. प्रा. तृप्ती महांबरे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

विचारवेध कविसंमेलनात ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. विलास सिंदगीकर तसेच राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे चौदा कवींनी कविता सादर केल्या. त्यामध्ये प्रकाश परदेशी, मीना शिंदे, डॉ. मीनल लाड, प्रा. सुमीत गुणवंत, डॉ. निर्मोही फडके, सुभाष चटणे, सुलभा सत्तुरवार, सीमा गांधी, अभिजित काळे, सुनंदा शिंगनाथ, रश्मी थोरात, रेणुका हजारे, चंद्रकांत शहासने, डॉ. राजेंद्र कांकरिया यांचा समावेश होता. प्रदीप गांधलीकर यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.

महाविद्यालयीन वार्षिक अंक पुरस्कार वितरण सोहळ्यात महात्मा फुले महाविद्यालय – ‘शाल्मली’ (प्रथम), प्रतिभा महाविद्यालय – ‘दीपप्रतिभा’ (द्वितीय), संघवी केशरी महाविद्यालय – ‘केशरी’ (तृतीय) आणि
इंद्रायणी महाविद्यालय – ‘इंद्राविष्कार’ (उत्तेजनार्थ) यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखा कार्यकारिणी आणि प्रतिभा महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा