You are currently viewing “शामसुंदर गांवकर लिखित भरती ओहोटी चरित्र ग्रंथातून वैशिष्ट्यपूर्ण जगणे आले आहे”  – जेष्ठ कवी अरुण म्हात्रे

“शामसुंदर गांवकर लिखित भरती ओहोटी चरित्र ग्रंथातून वैशिष्ट्यपूर्ण जगणे आले आहे”  – जेष्ठ कवी अरुण म्हात्रे

नवी मुंबई –

कोकणातील माणसांचा इतिहास मोठा असून त्यांचे जगणेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. शून्यातून जिद्दीने उभं राहणारी ही सर्व मोठी माणसं जगातील सर्वात मोठ्या समुद्र किनाऱ्यावर जन्मलेली आहेत. मग त्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर किती नावे घेता येतील असे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी परिषद वाशी मुंबई, कोकण मराठी साहित्य परिषद सी.बी.डी.बेलापूर आणि जाणीव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शामसुंदर कृष्णा गांवकर लिखित भरती ओहोटी या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी न्यू स्पोर्ट्स क्लब, सेक्टर दोन, वाशी येथे बोलताना सूचित केले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रा. डॉ अंकुश सारंग, लक्ष्मण तथा बापूसाहेब गावकर,  मोहन भोईर, शांताराम लोखंडे, प्रभाकर गावकर खोत, बाळासाहेब गडकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कवी अरुण म्हात्रे पुढे म्हणाले की, मोबाईलवर लिहिलेला पहिला चरित्र ग्रंथ असून त्यांचे पुस्तक तेही शामसुंदर गांवकर यांनी समुद्राशी संबंधित जीवन साहित्यात आणून वडिलांचा जगण्यातील साधेपणा आणि वडिलांचे ह्दय काय असते. सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर पुस्तक चांगल्याप्रकारे तयार करण्यात आले आहे. याबद्दल शामसुंदर गांवकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन शुभेच्छा देतो. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी देवगड तालुक्यातील गिर्ये बंडवाडी येथील धाडसी मच्छीमार स्वर्गीय कृष्णा घारू गांवकर त्यांचे सुपुत्र शामसुंदर गांवकर यांनी आपल्या वडिलांचा जीवनपट उलगडून सांगताना  खडतर जीवन प्रवास मांडला आहे. या पुस्तकाला शामसुंदर गांवकर यांचे शिक्षक प्राध्यापक डॉ अंकुश सारंग यांची प्रस्तावना लाभली असून प्रत्येकांनी आपल्या वडिलांना आठवावे असा तो चरित्र ग्रंथ घडला गेला असल्याचे नमूद केले. प्रा डॉ अंकुश सारंग यांनी शामसुंदर गांवकर मुळात कवी आहेत. त्यांनी आजच्या या पुस्तकातून विविध ग्रामीण आणि शहरी भागातील अनुभव त्यात मांडले असल्याने वडिलांच्या जीवन वैशिष्ट्यावर दृष्टिक्षेप टाकल्याची जाणीव होते. या प्रसंगी कवी दिगंबर गांवकर, प्रकाशक मोहन भोईर, उद्योजक बापूसाहेब गावकर, बाळासाहेब गडकर, शंकर गांवकर, प्रविण गावकर, प्रभाकर खोत गांवकर आदींनी आठवणींना उजाळा देत पुस्तकाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. रंगतदार कार्यक्रमासाठी लेखिका स्मिता वाजेवार, राजीव खंडागळे, अनंत माळगावकर, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दमयंती भोईर यांनी अतिशय मौलिक शब्दात केले. तर शांताराम लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 15 =