You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गाव कापडणे…*

 

मंडळी,

नमस्कार….

 

यात्रेत फिरतोय् ना आपण कापडण्याच्या! तुम्ही माझ्या बरोबर

आहात. किती छान वाटते आहे. अहो, यात्रा म्हणजे काही एकट्याने फिरण्याची गोष्ट आहे का? मस्त बैलगाडी जुंपावी,

घरातल्या आया बाया म्हाताऱ्या कोताऱ्या पोरे सोरे साऱ्यांनी

दाटावाटीने बसावे, खुळ खुळ छुन छुन करत बैलांनी पळावे, धुरकऱ्याने शेपटी पकडत बैलांना दामटवत हुर्रऽऽऽ हाय रे सर्जा करत शीळ घालावी, बायकांनी पदर तोंडाला लावत लाजत हसुन एकमेकींकडे बघत मान मुरडावी, पोरांनी चेकाळावे, धुळीचा फुफाटा उडवत बैलांनी हीऽऽऽ दुडकी धरावी, गाडीत कलकलाट चकचकाट हास्याचे फवारे उडत

पाठ बुड ठोकत ठेचकाळत तरी ही मजा घ्यावी.. अशी यात्रेला

गाडी निघाली तर मज्जा हो..

मग दिसली का गाडी? छकडी, मोठी छपराची.. बसलात ना

आरामात? हो आरामात हसत चाललोय आपण यात्रेला..

हो ना?

 

अहो, सांगायचे राहिलेच पहा, कापडण्याच्या भवानी मातेची

यात्रा असली तरी, भवानी मंदिरा बरोबर गावातले झेंड्या जवळचे विठ्ठल रखुमाई मंदिरही सजत असे बरं,त्यालाही

रंगरंगोटी होई, भाविकांचा राबता सतत त्या मंदिरातही असे.

तर, यात्रेत रात्री तमाशा, कुस्तीची दंगल, भगताची छा छू

पाळणे फुगे पिपाण्या गोंदणारे सारे जोरात असत.नदी पात्रात

हीऽऽऽ तंबूंची गर्दी असे.गोंदण्या वरून आठवले, पूर्वीच्या जमान्यात खेडोपाडी गोंदण्याचे फार प्रस्थ होते. प्रत्येक महिलेच्या अंगावर (मी सत्तर वर्षांपूर्वीचे बोलते आहे)भरपूर

गोंदलेले असे. खुद्द माझी. मोठी बहिण गोरीपान असलेली

तिच्या कपाळावर हातावर भरपूर गोंदले होते. माझ्या वडिलांना

ते बिलकुल पसंत नव्हते तरी ते त्यांच्या पश्चात गोंदले गेले

होते. मी सगळ्यात लहान. माझ्या मनात तिचे पाहून गोंदायचे

विचार येत ते घाबरून! कारण बायका म्हणत, देवा घरी गेल्यावर देव म्हणतो..” नांदी उनी पन गोंदी नही उनी”. मला

भीती वाटायची, बाप रे… देव मलाही असेच म्हणेल. पण घरातली चर्चा पाहता मला परवानगी मिळणे शक्यच नव्हते.

भीती तर प्रचंड वाटत होती. काय करावे? मैत्रिणीं सोबत

ठरवले की गुपचूप न सांगता गोंदवून घ्यायचे, फक्त कपाळावर

एक बारीक ठिपका. कुणाच्या कशाला लक्षात येईल? असा

विचार करून हिंमतीने गोंदवून घरी आले. तेव्हा फक्त ५/१० पैसे

लागत ते सहज मिळत असत घरातून. गोंदवून भीत भीत घरात

आले, बहिणीने बरोबर पकडले.” देख अक्का, बाई गोंदी उनी”! अक्काने पाहिले नि मी खजिल झाले. ती बिचारी रागावली नाही याचा जास्त त्रास झाला मला.

 

अशी यात्रा अगदी शिगोशिग भराला आली होती. कापडणे गाव पंचक्रोशित मोठे व नावाजलेले गाव. त्यामुळे धनूर सोनगिर न्यहाळोद धमाणे डाफरा डाफरी देवभाने हीऽऽऽ

यात्रेत झिंमड असे. लेकीबाळी यात्रेसाठी खास माहेरी आलेल्या, त्यांची हातभर बांगड्यांची हौस यात्रेतच पुरी होत

असे. शिवाय सोनगिरचे नावाजलेले भांड्यांचे व्यापारी बैलगाडी भरभरून माल आणत असत. हो, तेव्हा बैलगाडी हेच

वाहतुकीचे साधन होते. हांडे गुंडे बादल्या कळश्या तांब्याच्या

पितळेच्या, बंब पिंप मोठे मोठे घेरायचे पातेले( मी पण दोन

घेतले आहेत, आता पर्यंत नागलीचे पीठ घेरायला वापरले)

पराती अबबबबबब.. भांडीच भांडी नि बायकांची गर्दीच गर्दी..

हसत खेळत बायकांची खरेदी, गल्लीतून फेऱ्या, खुद्द माझी

आईच मला किती तरी वेळा भांडे दाखवायला आणायला लावायची, नंतर वजन करून किंमत काढून आणायची. हो,

खानदानी बायका अशा उठसूठ गल्लीने बाजारात जात नाहीत.

माझी आई शेतातही पडद्याच्या गाडीने जात असे. तर अशी ही

जत्रा भरास आलेली असे.

 

घरोघर पाहुणे आलेले, गावकुसाबाहेरची इतरत्र पोटभरायला

गेलेली मंडळी ही पांढरे स्वच्छ कपडे घालून गावात जत्रेसाठी

मुक्काम ठोकून असत. घरोघर पुरणपोळी कटाच्या आमटीचा

घमघमाट असे. मोठे प्रसन्न वातावरण असे गावात ८/१० दिवस!त्या वेळी एक मोठा डबा सायकलीला लावून एक माणूस बंबई देखो पुना देखो सिनेमा देखो म्हणत यात्रेत व

गल्लीतही फिरत असे. १० पैसे देऊन त्या डब्याच्या काचेला डोळा लावून मुंबईचे रेल्वे टॅक्सी यांची चित्रे फिरतांना त्यात दिसत. एक डोळा मिटून ती अद् भुत दुनिया बघायला फार

मजा येत असे.हा माणूस जत्रेतही भरपूर पैसा कमवत असे.

अशा या यात्रेतून टरबुजांचे ढीग मिठायांची दुकाने पहात आम्ही उगाच इकडून तिकडे भटकत शेवटी पाळण्याजवळ

रेंगाळत, पाळण्यात बसल्यावर तो वर जाताच पोट मुठीत

पकडून वाकडे तिकडे तोंड करत जीव मुठीत धरून बसत असू

व अंधार पडायच्या आत घरी येत असू.

 

अशा मग एका मागे एक जत्रांचे पेव फुटत असे. त्यात मग

सोनगिरची रथ यात्रा, धुळ्याची बालाजीची फेमस रथ यात्रा

यांचे प्रचंड आकर्षण असे. विख्रणची यात्रा, शिरपूरची व दोंडायच्या सारंगखेड्याची मोठी यात्रा यांचे बायकांना विशेष

आकर्षण असे कारण त्यात गाळण्या टोपल्या लाटणे पोळपाट

अशी बरीच खरेदी होत असे.मी सोनगिरची यात्रा आली की,

अक्का जवळ टुमणे लावत असे, माले जानं से जत्राले! पण

कोणा बरोबर जायचे. बरेच लोक तर पायी जात असत मधल्या रस्त्याने! मग एकदा शेजारच्या आजीची गाडी गेली

होती त्यांच्या बरोबर मी गेले. पण ते दुसऱ्याच कामासाठी

आल्यामुळे मला फिरवलेच नाही त्यांनी यात्रेत! त्यांचे काम

झाले नि आम्ही घरी परत आलो नि अशी माझी जत्रेची हौस पुरी झाली. धुळ्याच्या रथ यात्रेच्या गर्दीचा तर न विसरता येणारा अनुभव गाठीशी आहे. मामे भावा बरोबर रथ गल्लीत

गेलो पण एवढी प्रचंड गर्दी की मी चेंगरुन कानाची सालटी

निघालेली मला आठवतात. नंतर मात्र मी जत्रेला जायचे कधीच नाव काढले नाही अशी जन्माची अद्दल घडली. नशिब

कानांवर निभावले नाहीतर हा लेख काही तुम्हाला वाचायला

मिळाला नसता !खोल गल्लीतून पाचकंदिल कडे यात्रा कूच

करतांना दोर ओढायला तुफान गर्दी होत असे. त्यात खेड्या

पाड्यातून आलेल्या मंडळींची गर्दी विचारूच नका.मला आता ही रात्रीचे ते दृश्य, तो प्रचंड जनसमुदाय, ती रथाची चाके हळूहळू हलतांना लोक हार फुले फेकतांना डोळ्यासमोर दिसत

आहेत. अगदी अलिकडे एकदा धुळ्याला गेलो असता नेमकी

सारंगखेड्याची यात्रा होती नि मग आम्ही सर्व यात्रेला गेलो होतो, देवदर्शन घेतले, नि यात्रेत फिरता फिरता मिसळ व गुळाची जिलेबी खाल्ली, मजा आली.सारंगखेडायाची यात्रा

घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

 

अहो, त्या वेळी मनोरंजनाची हीच साधने होती. ना टी व्ही होता

ना मोबाईल ना फोन. मग यात्रा व सिनेमा प्रचंड आकर्षण असे.

मुगलेआजम सिनेमाने १९६१ साली विक्रम केला तो बैलगाड्यांचा! गावोगावच्या शेकडो गाड्या थिएटर बाहेर थांबून

हजारो खेडुतांनी मुगलेआजम पाहिला व बैलगाडीत बसून थेट

घरी गेले.आहे ना मजेशिर गोष्ट. थिएटर बाहेर बैलगाड्यांचा तळ पडत असे.आम्ही पण बैलगाडीतूनच गेलो होतो बघायला.

सहावी सातवीचे वय, फक्त काचेचा महाल लक्षात राहिला.

बाकी काही समजले नाही व आठवतही नाही.

तर अशा या यात्रा नि असे हे सिनेमे.

तर …

बाय बाय मंडळी, असेच प्रेम राहू द्या. भेटू पुढच्या रविवारी..

 

धन्यवाद, जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा