You are currently viewing आता शैक्षणिक कार्यात शिक्षकांना झोकून द्यावे लागेल! -शिक्षणतज्ज्ञ एल. एम. पवार

आता शैक्षणिक कार्यात शिक्षकांना झोकून द्यावे लागेल! -शिक्षणतज्ज्ञ एल. एम. पवार

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :

खेड्यातील शाळेमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवायची असेल तर आता शिक्षकांना शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून आपले कसब सिध्द करावे लागेल, असे आवाहन नसरापूर श्री शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि विद्यमान संस्थासचिव एल. एम. पवार यांनी शिक्षकांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना केले आहे.

शिक्षणाचे माहेरघर ठरलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण मंडळाची पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या नसरापूर येथील श्री शिवाजी विद्यालयात नुकताच १९९६च्या बॅचच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा ‘स्नेहमेळावा” आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एल. एम‌. पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

श्री शिवाजी विद्यालयात नसरापूरसह पंचक्रोशीतील विद्यार्थी एकत्र येत असत, प्रत्येक वर्ग विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेला असे, या भूतकाळातील आठवणींना आपल्या भाषणात एल. एम. पवार यांनी उजाळा दिला. परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही, याबाबत खंत व्यक्त करून‌ श्री पवार म्हणाले, गुरूशिष्य परंपरा या अशा गावांमधील असंख्य शाळांपासून सुरू झाली आहे. शिक्षक वर्गाने पूर्वीपासूनच ‘शिक्षक’ ही नोकरी नसून ‘शैक्षणिक सेवा धर्म’ मानला आहे. आजही ही परंपरा जोपासली जात आहे. पण शहराकडील शिक्षणाकडे पालकांचा ओढा वाढला आणि येथील शाळांची पटसंख्या रोडावली. पण एक दिवस असा उजाडेल की, खेड्या-पाड्यातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांची रीघ लागेल आणि येथील पूर्ववैभव प्राप्त करण्यास शिक्षक नक्कीच यशस्वी ठरतील, असा ठाम विश्वासही शिक्षणतज्ज्ञ एल. एम. पवार यांनी व्यक्त केला.

स्नेहमेळाव्याला तत्कालीन शिक्षक एस. यादव, पी. एन. खुटवड, व्ही. बी. शेवाळे, पी. बी. भोर, एस. एस. गायकवाड, एल‌. एच. शिंदे, आर. जी. पोळ उपस्थित होते. तर तत्कालीन विद्यार्थी खडकी गावचे सरपंच सचिन रांजणे, उबाठा शिवसेनेच्या शाखाप्रमुख उज्वला गाडे (भगत), विजय थिटे, नाना शिळीमकर, योगेश बागमार, रविंद्र शेडगे, गणेश गोळे, रविंद्र मांढरे, नंदा सकपाळ उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नियोजन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव शिंदे, पर्यवेक्षक अंकूश खोपडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला प्रोजेक्टर भेट देऊन शाळेविषयी आपला स्नेहभाव वृद्धिंगत केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा