मुंबई :
यावर्षी केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक व छायाचित्रकार व सुप्रसिद्ध समाजसेवी श्री जनार्दन पंत बोथे यांचा उद्या सकाळी 11 वाजता मुंबई येथे लोकभवनात म्हणजे पूर्वीच्या राजभवनात सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. हा सत्कार माननीय राज्यपाल यांनी आयोजित केलेला आहे. श्री जनार्दन पंत बोथे यांनी केलेल्या अतुलनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे .त्यानिमित्त त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत आहेत. सन्माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार महाराष्ट्र शासनाच्या लोक भवनातील मलबार हिल येथील सभागृहात आयोजित केलेला आहे.
माननीय राज्यपालांच्या वतीने राज्यपालांचे सचिव व विदर्भाचे सुपुत्र व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी श्री बोथेदादा यांच्याशी संपर्क साधून या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती एका पत्रान्वयेव केली आहे .या कार्यक्रमासाठी त्यांना सहपरिवार निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्राम जयंती आज संपूर्ण भारतात संपन्न होत आहे .या जयंतीदिनी हा सत्काराचा संदेश आल्याबद्दल श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये व गुरुदेव भक्तांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी ग्राम जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथील आश्रमात येऊन श्री जनार्दन पंत बोथे यांना याप्रसंगी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
