You are currently viewing उद्या सावंतवाडी मतदारसंघात दीडशे कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने

उद्या सावंतवाडी मतदारसंघात दीडशे कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन; पत्रकार परिषदेत माहिती

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरात ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शनिवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे, तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील सुमारे दीडशे कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने होणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली अनेक विकास कामे मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राज्यातील अन्य मंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व विकास कामांना प्राधान्य दिले असून लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विकास कामांमध्ये प्रामुख्याने सावंतवाडी शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाळणेकोंड धरणावरून सुधारित नळपाणी योजनेसाठी तब्बल 56 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तर माजगाव चिपटेवाडी येथे मृदू व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत २३ कोटींचे धरण मंजूर करण्यात आले आहे. शिवाय याच भागात १ कोटी १३ लाख रुपयांची दोन पुलांची कामेही मंजूर करण्यात आली आहेत. या तिन्ही कामांचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

तर वेंगुर्ले तालुक्यातील नगरपरिषद जलतरण तलावाचे विकसन करणे ५१ लक्ष ९३ हजार, वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील फळ संशोधन केंद्र गडगा ते समीर रेस्ट हाऊस पर्यंत जाणारा रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे ४५ लाख, वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुधारित करण्यासाठी शहरातील अस्तित्वातील वितरण वाहिन्या नव्याने घालणे यासाठी १ कोटी दीड लाख तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेतील इम्युलेट कन्सेप्शन चर्च वेगुर्ले स्मशानभूमी सुशोभीकरण करणे ३० लाख रुपये, वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील आईस फॅक्टरी ते गिरगोल फर्नांडिस पर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ५३ कोटी ६७ लाख, वेंगुर्ला झुलता पूल ते बंदरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ७५ लाख रुपये एवढा निधीही मंजूर करण्यात आला असून या कामांची भूमिपूजनेही शनिवारी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती यावेळी सचिन वालावलकर यांनी दिली.

सावंतवाडी मतदार संघातील कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर जनते मधून समाधान व्यक्त होत आहे. विरोधकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही मात्र उद्या होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातूनच त्यांना चोख उत्तर मिळेल, असे यावेळी राजन पोकळे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा