You are currently viewing आता देशी गाईच्या शेणापासून गणेश मुर्ती…

आता देशी गाईच्या शेणापासून गणेश मुर्ती…

वैभववाडी 

देशी गायींचे शेण आणि मातीपासून पर्यावरणपुरक 10 हजार गणेशमूर्ती तयार करून त्या विविध शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचा संकल्प प्रवण फार्मर कंपनी आणि लुपिन फाऊंडेशनने केला आहे. जिल्ह्यातील 100 मूर्तीकारांना सात्वीक गोमेय गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पर्यावरणपुरक उपक्रमाला वैभववाडीतून प्रारंभ झाला आहे.

आयुर्वेदात देशी गायीचे शेण, गोमुत्र, तुप, दुध, दही आदीला अनन्य साधारण महत्व आहे; परंतु अलीकडे वाढलेल्या यांत्रिकीकरणात देशी गायींचे संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे देशी गायीचे संवर्धन व्हावे, यासाठी गायीपासून मिळणाऱ्या दुधावरच अवलंबुन न राहता गायीच्या शेणाला देखील प्रतिकिलो 100 रूपये दर मिळाला पाहिजे. यासाठी वैभववाडी तालुक्‍यातील प्रणव फार्मर कंपनी आणि लुपिन फाऊंडेशनने प्रयत्न सुरू केले आहेत.

यापुर्वी या दोन्ही संस्थांनी अनेक महिलांना गायीच्या शेणांपासून पणत्या, धुपकांडी, अगरबत्ती, शेणाच्या गोवऱ्या आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तशाप्रकारचे साचे देखील कंपनीमार्फत महिला बचतगटांना दिले आहेत. वर्षभरात 1 लाख पणत्या बनवुन त्या राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

एकीकडे हे काम सुरू असताना आता या दोन्ही संस्थांनी देशी गायीचे शेण आणि आवश्‍यक मातीपासून पर्यावरणपुरक गणेशमूर्ती बनवुन त्या लोकांपर्यत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यातील 100 मूर्तीकारांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्या मूर्तीकारांकडुन प्रत्येक 100 गणेश मूर्ती बनवुन घेण्यात येणार आहेत.

पाण्यात झटपट विरघळणाऱ्या आणि वजनाने हलक्‍या असणाऱ्या या 10 हजार मूर्ती पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपुर यासह विविध शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पर्यावरणप्रेमीपर्यंत या मूर्ती पोहोचवुन प्राथमिक जनजागृती करून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील चार-पाच तालुक्‍यातील मूर्तीकारांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमांचा प्रारंभ सुवर्णसिंधु गोशाळा मांगवली येथे लुपिनचे जिल्हा प्रकल्प अधिकारी योगेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्रवणचे अध्यक्ष महेश संसारे, संतोष कुडतरकर, प्रशिक्षक श्री. मळगावकर, सचिन म्हापुसकर, मंगेश कदम, सुहास सावंत आदी उपस्थित होते.

आध्यात्मिकदृष्ट्या गायीला खूप महत्व आहे. त्यामुळे गायीच्या शेणापासून बनविलेल्या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास स्थानिक मूर्तीकारांना काम मिळेल. याशिवाय पर्यावरणपुरक आणि कमीत कमी किमतीमध्ये मूर्ती उपलब्ध होईल. आरोग्यासाठी देशी गायीचे संवर्धन आणि संगोपन महत्वाचे असून त्यासाठीच पुढाकार घेतला आहे.
– महेश संसारे, अध्यक्ष, प्रवण फार्मर कंपनी.

देशी गायीच्या संवर्धनासाठी उपक्रम

*जिल्ह्यातील 100 मूर्तीकारांना देणार प्रशिक्षण
*राज्यातील विविध शहरांमध्ये मूर्ती उपलब्ध करून देणार
* मूर्तीकारांना मोबदला मिळवुन देण्यासाठी प्रयत्न
* स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार
* गोमय पणत्या, धुपकांडी, अगरबत्तीचा प्रयोग यशस्वी
* पहिल्या वर्षी 10 हजार मूर्ती बनविण्याचा संकल्प

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =