You are currently viewing स्मृति भाग ३९

स्मृति भाग ३९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य.भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३९*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

मागील भागात गुरु शिष्यावरील कथा पाहिली . आता चवथा अध्यायातील श्लोक पाहू . नाव *”विवाहसंस्कारवर्णनम् ” !* नावातच संस्कार !! पण आज लग्न करणारांपैकी किती टक्के लोकंना विवाह हा संस्कार वाटतो ? गहन प्रश्न आहे !! यात—

 

*विन्देत विधिवत्भार्यामसमानार्षगोत्रजाम् ।*

*मातृतःपञ्चमीञ्चापि पितृतस्त्वथ सप्तमीम् ॥*

( विद्यार्जन पूर्ण झाल्यावर ) द्विजाने आपले प्रवर व गोत्रापेक्षा भिन्न प्रवर व गोत्राच्या अथवा मातेच्या पाच व पित्याच्या सात पिढींपासून अन्य वेगळ्या भार्येस प्राप्त करावे .

या श्लोकातील अथवा शब्दाकडे जर लक्ष दिले तर दोहोंकडून सात पिढ्यांपलिकडील स्वगोत्रीही करण्यास हरकत असावी का नसावी ? यावर जर संवाद घेतला तर ब्राह्मणांचेच काय , सर्वांचेच प्रश्न सुटावे !!!!!!!! आता विवाहाचे प्रकार पाहू .

 

*ब्राह्मो दैवस्तथैवाSSर्षः प्राजापत्यस्तथाSSसुरः|*

*गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाSष्टमोSधमः ॥*

१) ब्राह्म , २)दैव , ३)आर्ष ,४)प्राजापत्य , ५)आसुर , ६)राक्षस आणि ८)पैशाच हे आठ प्रकारचे विवाह असूनआठवा पैशाच सर्वात निकृष्ट आहे .

आता याच्या व्याख्या वा सविस्तर वर्णनासाठी आपापल्या ब्रह्मवृन्दास विचारावे .

 

*सा भार्य्या या वहेदग्निं सा भार्य्या या पतिव्रता ।*

*सा भार्य्या या पतिप्राणा सा भार्य्या या प्रजावती ॥*

पत्नी तीच जी आपल्या पतीच्या यज्ञात भागीदार असेल , पतीचे व्रताचरण करणारी असेल , जिला पति प्राणाहुनही प्रिय असेल आणि जी सन्तान असणारी असेल !!

यज्ञ हा शब्द ” युज् ” धातूपासून बनलेला आहे . त्याचा अर्थ जोडलेला वा जोडलेले असणे . आयुष्यात प्रत्येक चांगले कर्म करताना ” देव माझेसोबत आहेच ” ही जाणीव मंगल कर्म करुन घेते . आणि पति मंगल कर्म करत असतांना त्याच्याशी त्याच्या पत्नीने सहमत असणे वा साथ देणे वा जोडलेले असणे ! हे यज्ञीय कर्म होणार नाही का ? आपण जेवण करतांनासुद्धा सहज म्हणतो , ” उदरभरण नोहे , जाणिजे यज्ञकर्म ” ! आमच्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीय जेवणही यज्ञीय कर्म सांगितले आहे !! यज्ञ म्हणजे नुसते होमकुंडात आहुत्या देणे नव्हेच ! ते आणि त्याशिवाय कर्म करण्याच्या पद्धतीवर प्रत्येक कर्म हे यज्ञीय करता येवू शकतेच !!!! पतीच्या व्रताचरणाशी बांधील तरी असावी ! पती प्राणाहून प्रिय असावा , ही गोष्ट छोटी नव्हेच !! आणि स्त्रीजवळच गर्भाशय असल्याने तिच्याशिवाय सन्तानोत्पत्ती शक्य नाही ! म्हणून ती सन्तानवाली असणं श्रेयस्कर मानले गेले आहे ! आज ” स्वातंत्र्याचा ” अधिकार इतका बळावलाय की ” बंधन आणि धन ” या दोघांना माणूस पारखा झालाय !! स्त्री स्वातंत्र्य तर विचारायची सोयच नाही !! समाजात स्वातंत्र्याचे नावाखाली स्वैराचार बळावलाय व सीता आणि अहल्याचे ऐवजी त्राटिका , रंभा , मेनका , शूर्पणखा यांची चलती जास्त आहे !!! याला कारण अविचारांना विकली गेलेली राज्यपद्धती !!!!

 

*लालनीया सदा भार्य्या ताडनीया तथैव च ।*

*लालिता ताडिता चैव स्त्री श्रीर्भवति नान्यथा ॥*

पत्नि सदा लालन व ताडनाचे योग्य आहे . लालन व ताडनानेच ती स्त्री लक्ष्मी बनते , अन्यथा नाही !!

लालनाचे योग्य इथवर ठीक , पण ताडनाचे योग्य ? हे कसं काय ? पुढे म्हटले आहे की ती लक्ष्मी बनते . स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले आहे . पण ती जर गृहलक्ष्मीसमान वागत नसेल तर ! पतीचे यज्ञीय कर्मात तिची साथ नसेल तर ? स्त्री शरीर व मन आणि पुरुष शरीर व मन हे वेगळे आहे ! त्यानुसार कुणी कसा आचार—विचार—उच्चार करावा याचे शास्त्रच ऋषिंनी पक्के करुन ठेवले आहे ! तसे राहिले तर आम्ही आजही जगात श्रेष्ठ आहोत .

मी शाळेत शिकत असतांना आमचे गावाबाहेर एकवीरेच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो . मित्रपरिवार होताच . दर्शन करुन परत येतांना आम्ही एक आदिवासी जोडपे दारु पिवून भांडतांना पाहिले . दोघेही प्यायलेले . नवरा तिला मस्त मारत होता . आमच्यातल्या एकाला तिची दया आली व त्याने त्या माणसाची काॅलर धरुन बाजूला खेचलेच !! स्त्री ला वाटले की हा तिच्या नवर्‍याला मारेलच ! तशी ती मित्राचे अंगावर धावलीच !! आणि नवर्‍याला सोडवत म्हणाली , ” ए तो माझा नवरा आहे , मारुन का टाकेना मला ! तूला काय करायचे ? ” आम्ही घरीच भिन्नाट !! इथपर्यंत रुजलेली व विश्वासून असलेली संस्कृती स्त्री स्वैराचारानेच उद्ध्वस्त होते आहे का ? हा विवादाचा मोठा मुद्दा होवू शकतो . स्त्री हा भोगवादी पदार्थ नसून ती माता भगिनी म्हणूनच ज्या संस्कृतीत गौरवली गेली , तिथे आज स्त्री स्वातंत्र्याचे नावाखाली स्वैराचार बोकाळलाय व याला काही अंशी कारणीभूत वाममार्गस्थ पुरुष ही आहेच !! मुद्दा मोठाच आहे . ताडनावर करु विचार उद्या पुन्हा !! आज थांबतो .

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा