You are currently viewing शासन निर्णय होईपर्यंत शाळेत मुले नको – दिलीप तळेकर

शासन निर्णय होईपर्यंत शाळेत मुले नको – दिलीप तळेकर

गृहभेटीआधी शिक्षकांच्या कोरोना चाचणी करा…

कणकवली
जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुलांना पालक प्राथमिक शाळेत पाठवणार नाहीत. आमचाही त्याला विरोध असेल. तसेच शिक्षकांना जर गृहभेटी देऊन शिक्षण देण्याची सक्ती होत असेल तर त्याआधी त्या शिक्षकांची कोरोना चाचणी शिक्षण विभागाने करून घ्यावी अशी मागणी कणकवली सभापती दिलीप तळेकर यांनी आज केली.
येथील आपल्या दालनात श्री.तळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी अनिल चव्हाण, गटशिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, सदस्य मिलिंद मेस्त्री, हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते.
श्री.तळेकर म्हणाले, कणकवली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. तालुक्यात सध्यस्थितीत कोरोनाचे ७० सक्रिय रूग्ण आहेत. तर शिक्षकांपैकी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याखेरीज दररोज कोरोना रूग्ण संख्याही वाढत आहे. अशा स्थितीत प्राथमिक शाळा सुरू करणे धोक्याचे आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली पंचायत समितीने शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम २३ जून रोजी सुरू केला तर ७ ऑक्टोबरला विद्यार्थ्यांची मुल्यमापन चाचणी घेण्यात आली. सध्या अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत. आता शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. तर मुलांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी गृहभेटी द्याव्यात अशा सूचना केल्या आहेत. पण शिक्षक जर विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत पोचत असतील तर त्यांची कोरोना चाचणी झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. शासनाने नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरू केल्या, तेव्हा माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या. तसा प्राथमिक बाबत शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. जोपर्यंत शासन काळात सुरू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही. तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक आहे. सध्या परिस्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे तालुक्यातील शालेय विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत. शिक्षकांनीही त्यांच्या घरी जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करूनच गेले पाहिजे अशी सूचनाही सभापतींनी मांडली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा