You are currently viewing रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन

रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन

रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन

 अपघातातील मृतांची वाढती संख्या चिंताजनक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

  • रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करावी
  • धोकादायक ठिकाणे निश्चित करा
  • दिशादर्शक फलक बसवा

सिंधुदुर्गनगरी

नियमांचे पालन न करणे, अनियंत्रित वेग अशा अनेक कारणांमुळे रस्ते अपघातात वाढ होत असून त्यात प्राण गमावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने परिवहन विभागाने नियमित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

      सिंधुदुर्ग जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व 2024 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.  

         यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार सर्वगोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, एस टी विभाग नियंत्रक अभिजित पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर आदी उपस्थित होते. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान संदर्भातील शपथ उपस्थितांना दिली. रस्ता सुरक्षा दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महिला रिक्षा परवाना असलेल्या रिक्षा चालकांचा, विना अपघात बस चालविणाऱ्या वाहन चालकांचा आणि अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करणाऱ्या नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

             श्री नायर म्हणाले, महामार्गावरील दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा ठिकाणी परिवहन विभाग आणि महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त पाहणी करून असे ठिकाण सीसी टिव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली आणावे.  नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करावे. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचाही जीव धोक्यात येतो. नागरिकांना वाहन चालविताना तसेच रस्त्यावर चालत असताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे, यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व सांगून जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

   अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले म्हणाले की, जीवन अमूल्य आहे. त्यामुळे वाहन चालविताना सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरुणांनी दुचाकी चालवतांना वेगावर नियंत्रण ठेवावे.  अपघातांत 15 ते 35 वयोगटातील तरुणांच्या मृत्युचे प्रमाण अधिक असल्याने पालकांनी मुलांच्या हातात दुचाकी देताना नक्कीच  विचार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

     निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे म्हणाले की, तरुण मुलांनी वाहन चालवितांना हेडफोनचा वापर करु नये, वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज येत नसल्याने अपघात घडण्याची शक्यता जास्त असल्याने याबाबत जनजागृती आणि उपाययोजना व्हावी याकडेही त्यांनी परिवहन विभागाचे लक्ष वेधले.

            प्रास्ताविकात श्री काळे  यांनी मागील 3 वर्षांतील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले. ते म्हणाले जिल्ह्यात अपघात आणि त्यातील मृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात हे प्रमाण  अधिक आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर संभाषण करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे अशा अनेक कारणांमुळे अपघात वाढत आहेत.  वाहतूक नियमांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी  यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seven =