वेंगुर्ले :
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वनविभाग व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यातून ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या अंड्याचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते. त्याअनुषंगाने यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या १२१ पिल्लांची पहिली बॅच आज वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हुलमेवाडी समुद्र किनारपट्टीवर घरट्यातून बाहेर आली. या सर्व पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले.
वायंगणी येथील कासव मित्र सुहास तोरस्कर यांनी संरक्षित केलेल्या घरट्यामधून आज सकाळी ही पिल्ले बाहेर आली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर मा.श्री.नवकिशोर रेड्डी ,उप वनसंरक्षक सावंतवाडी वन विभाग, डॉ.श्री.सुनील लाड सहायक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शना खाली व वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार .वणपाल मठ श्री. सावळा कांबळे, वनरक्षक मठ श्री. सावंत यांच्या उपस्थितीत या सर्व पिल्लांना सुखरूप पणे समुद्राच्या पाण्यात सोडून जीवदान देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागातील स्थानिक नागरिक यांनी या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यात वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे